छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी | विजय पाटील |
दि. १४/०९/२०२३ मराठा आरक्षणावरून जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून संपूर्ण राज्याला हादरवून सोडणार्या मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर तूर्त उपोषण मागे घेतले. उपोषण सोडवण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी पोहोचून केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी तूर्त आपले उपोषण सोडले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आंदोलनकर्त्या मराठा समाजाला शब्द दिला. मराठा आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, १४ सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली – सराटी येथे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडले.
प्रकृतीची विचारपूस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन जरांगे पाटील यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, चर्चा केली. यावेळी त्यांनी जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण आंदोलकांच्या बहुतांश मागण्यांबाबत शासन ठोसपणे कार्यवाही करत असल्याचे सांगितले. ‘सारथी’ तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाशी संबंधित मागण्यांवर तातडीने कार्यवाही केली जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. मराठा समाज आणि आरक्षणाबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी सरळ भूमिका मांडली, ते जिद्दीने आणि चिकाटीने आंदोलन पुढे नेत आहेत. ज्यांचा हेतू शुद्ध असतो स्वच्छ असतो प्रामाणिक असतो त्याच्यामागे अशी जनता खंबीरपणे उभे राहते. म्हणूनच पहिल्या दिवसापासून या ठिकाणी लोकांनी आणि जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. यापूर्वी देखील सरकारने मराठा समाजाला आरक्षण १६ते १७ टक्के आरक्षण दिले होते. हे आरक्षण उच्च न्यायालयात देखील टिकले होते. पण ते पुढे सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले. ते का झाले, कसे झाले याची चर्चा अनेकदा झाली आहे. त्याची माहिती जरांगे पाटील यांच्यासह सर्वांनाच आणि आंदोलकांनाही आहे. याबाबत परवा रात्री आपल्या शिष्टमंडळाशीही चर्चा केली आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
सत्यप्रभा न्यूज