बीड : परळीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत. कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजप नेत्या पंकजा मुंडे, तर उपाध्यक्षपदी धनंजय मुंडे गटाच्या चंद्रकांत कराड यांची निवड करण्यात आली आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर गोपीनाथ मुंडे यांचं वर्चस्व होतं. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर या कारखान्याची जबाबदारी ही पंकजा मुंडे यांनी सांभाळली. पुन्हा एकदा वैद्यनाथ साखर कारखाना पांगरीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक बिनविरोध केली.
अध्यक्ष म्हणून पंकजा मुंडे पुन्हा एकदा या पदावर विराजमान झाल्या आहेत तर उपाध्यक्षपदी धनंजय मुंडे गटाचे चंद्रकांत कराड यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत धनंजय मुंडे गटाचे १० उमेदवार, तर पंकजा मुंडे यांचे ११ उमेदवार अशी बांधणी करण्यात आली. पंकजा मुंडे यांच्या हाती वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा पुन्हा देण्यात आला आहे. आज सकाळी ११ वाजता चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती. चेअरमन पदासाठी पंकजा मुंडे यांचा एकमताने अर्ज आल्यानंतर त्यांची निवड घोषित करण्यात आली, तर आमदार धनंजय मुंडे यांच्या गटाचे चंद्रकांत कराड यांची व्हाईस चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते. त्याचबरोबर आतापर्यंत बहिणी विरोधात भाऊ या वादावर निवडणुकीनंतर कुठेतरी पडदा पडल्याचा पाहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशाच लढती परळीत पाहायला मिळाल्या. मात्र या निवडणुकीत दोन्ही बहीण भावाचं वर्चस्व पाहायला मिळालं. यात बहिणीसाठी बंधू धनंजय मुंडे यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून वैद्यनाथ साखर कारखान्यावर वर्चस्व ठेवून असलेल्या पंकजा मुंडे यांच्या हाती पुन्हा एकदा साखर कारखान्याची धुरा देण्यात आली आहे. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड