नांदेड दि. 29 :- वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागामार्फत विविध आरोग्य विषयक जनजागृती मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. राज्यभर राबविल्या जाणाऱ्या या जनजागृती अभियानासाठी एल.ई.डी. व्हॅनद्वारे प्रचार व प्रसिध्दी करण्यात येत आहे. नांदेड जिल्हयामध्ये 31 मेपर्यंत विविध ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आरोग्य विषयक प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी एल.ई.डी. व्हॅनची सेवा शासनाद्वारे देण्यात आली आहे. या एल.ई.डी. व्हॅनद्वारे दाखविण्यात येणाऱ्या चित्रफितीचे उदघाटन नुकतेच प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ तथा अधिष्ठाता डॉ. एस.आर.वाकोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये थायरॉईड, स्तन कर्करोग, अवयवदान, रक्तदान, स्वच्छमुख अभियान व स्थुलपणा या विषयांवर आरोग्याशी निगडीत चित्रफीतीद्वारे विविध भागामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. आजघडीला जनसामान्यामध्ये आरोग्य विषयक योग्य आणि शास्त्रीय माहिती पोहचविणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य विषयक जागृती वेळेवर मिळाल्यास अनेक दूर्धर आजार आणि मृत्यु रोखता येणे शक्य आहे, असे प्रतिपदान अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांनी केले. नांदेड जिल्हयामध्ये चार दिवस चालणाऱ्या या प्रचार आणि प्रसार कार्यक्रमासाठी रविवारी वैद्यकीय महाविद्यालय परिसर, इतवारा बाजार, श्यामनगर या ठिकाणी एल.ई.डी. व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. आर.डी. गाडेकर , डॉ. आय.एफ. इनामदार, आर.एम.ओ डॉ. अभिजीत देवघरे, डॉ. ज्ञानोबा जोगदंड, डॉ. कपिल गोरे, डॉ. पुजिता, डॉ. सानिया, डॉ. देवी, डॉ. ऐश्वर्या, वैद्यकीय सेवा अधीक्षक वानखेडे यांनी मेहनत घेतली आहे. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड