नांदेड दि.२२: किनवटच्या सहाय्यक वनसंरक्षकांच्या कार्यकक्षेतील मांडवी वनपरिक्षेत्राच्या सारखणी घाटात २७ ऑक्टोबर रोजीच्या रात्री बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करुन प्रकरण रफादफा करण्याच्या हेतुने वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वनविभागाला बिबट्याची प्रथम खबर देणारा बाळू नथू पवार यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करून बिबट्याचे मागचे पाय थोडे थोडे हालचाल करत होते असे लिहुन घेऊन दिनांक २८ ऑक्टोबर रोजी जबाब पत्रावर सही घेऊन मोकळे झाले.
मृत बिबट्या गायब केल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच आहेत. २७ डिसेंबर रोजी दोन महिने होणार आहेत. तरीही नांदेडचे उपवनसंरक्षक, किनवटचे सहाय्यक वनसंरक्षक आणि मांडवीचे वनक्षेत्रपाल यांनी मृत बिबट्या विषयी जीवंत असल्याचा अथवा मृत्त झाल्याचा खुलासा करण्याचे धाडस दाखवले नसल्याने लोकांमध्ये संताप व्यक्त होतांना दिसत आहे. नांदेड वनपरिक्षेत्र कार्यालयाचे सहाय्यक वनसंरक्षक गणेश गिरी यांनी मृत बिबट्या जंगलात पळून गेल्याचा जावई शोध लावला होता. तोही फोल ठरला आहे. येत्या काही दिवसांत वनविभागाने खुलासा न केल्यास वनप्रेमी वन्यजीवप्रेमी रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मांडवीचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी बाळू नथू पवार यांच्याकडून जबाब पत्रावर सही घेऊन आपली चाणाक्ष बुध्दी दाखवून दिली आहे. परंतु बिबट्या मृत झालेला पहाणारे अजून चार साक्षीदार शिल्लक आहेत हे वनविभागाला नाकारता येणार नाही. मृत बिबट्या प्रकरणी, दोषी वन अधिकार्यांवर कार्यवाही साठी वरिष्ठ कधी मुहूर्त काढतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड