नांदेड दि २७ : जिल्ह्यात उन्हाळ्याच्या संभाव्य काळात पाणीटंचाई व जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी संबंधित विभागानी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संभाव्य पाणी टंचाई आराखडा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्ह्यातील पाण्याच्या व चाऱ्याच्या उपलब्धतेचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आढावा घेतला. तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू शकते अशा ठिकाणी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना दिल्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यात विहिर अधिग्रहण, तात्पुरता पाणी पुरवठा व टंचाई निवारणासाठीची कामे आगामी काळात प्राधान्याने राबविले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सद्यस्थितीत जिल्ह्यात चाऱ्याबाबत कुठल्याही प्रकारची चणचण नसल्याचे यावेळी सांगितले. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागावर लक्ष ठेवून असावे असेही यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना निर्देशित केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड