दिनेश येरेकर
नांदेड दि.२१ : खासदारांच्या एम्पीलैड्स आणि आमदारांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतील दिव्यांगांचा दरवर्षीचा 30 लक्ष रूपये खर्च न करताच नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूका नुकत्याच पार पडल्या आहेत आणि या महोत्सवात सहभागी होत जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत व लोकशाही बळकट करण्यासाठी नांदेड शहर व संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांनी भरभरून मतदान केले आहे आणि यासाठी जिल्हा प्रशासनाने गृहमतदानासह मतदान केंद्रावर व्हिलचेअरसह इतर सर्व सोयी सुविधा दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध केल्या होत्या परंतु आता त्याच दिव्यांग मतदारांना जागतिक दिव्यांग दिनी आक्रोश मोर्चा काढून आंदोलन करण्याची वेळ याच लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने आणली असल्याचे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. साळवे यांनी म्हटले आहे की,अपंग पुनर्वसन कायदा 1995 ची तर अमंलबजावणी झालीच नाही परंतु त्यात सुधारणा करून आरपीडबलुडी ॲक्ट 2016 सुद्धा कागदावरच आहे,यासह महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण 2018 ची सुद्धा अमंलबजावणी झाली नाही तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील शासन निर्णयांची सुद्धा अंमलबजावणी काटेकोरपणे अद्याप करण्यात आली नाही.आमदार, खासदारासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्थांकडील दिव्यांगांचा राखीव निधी अखर्चितच आहे. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी जागा. हक्काचे घरकुल, शासकीय अनुशेष भरून काढणे हे केवळ कागदावरच राहिले असल्याचे म्हणत साळवे म्हणाले की यंदाच्या 2024 च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत सर्वच राजकीय पक्षांनी आप-आपला जाहिरनामा प्रकाशीत केला पण त्यात दिव्यांगांसाठी कुठलीच विशेष तरतूद केली नाही. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील मानधन सुद्धा वाढविण्यात आले नसल्याचे साळवे म्हणाले.शासन दिव्यांगांच्या दारी अभियानातुन दिव्यांगांची फसवणूक करणाऱ्या याच शासन प्रशासनाने पुन्हा एकदा दिव्यांगांची फसवणूक मोठ्या प्रमाणात मतदानाच्या रूपात करून घेतल्याचे साळवे म्हणाले, दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळावे हि आमची गत १४ वर्षापासून च्या मागणीची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी खिल्ली उडविली असल्याचे म्हणत याचे पडसाद ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी नांदेडमध्ये उमटणार असल्याचे राहुल साळवे यांनी म्हटले आहे.
३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी सकाळी १० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा रेल्वे स्टेशन समोर नांदेड येथुन दिव्यांगांचा आक्रोश मोर्चा निघणार असल्याचे म्हणत नांदेड शहर व संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांना या आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सकल बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती नांदेड कडून करण्यात आले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड