नांदेड दि.१४: संशोधन हे समाजाच्या उपयोगासाठी असते, याचे सदैव भान राखले जावे. संशोधन हे अधिक वस्तुनिष्ठ हवे. डिजिटल काळात ज्ञानाची नवनवी क्षेत्र उदयास येत आहेत. ज्ञानाच्या प्रभावी प्रसारासाठी ही डिजिटल माध्यमे वरदान ठरली आहेत, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलाच्यावतीने ‘डिजिटल युगात माध्यमे आणि माहितीशास्त्र’ या विषयावर अधिसभा सभागृहात आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार, मुंबई विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. सुंदर राजदीप, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर आणि माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ. निशा मुडे-पवार म्हणाल्या की, कृत्रिम बुध्दिमत्तेने डिजिटल माध्यमांमध्ये केवळ बदल केला नाही तर त्यांनी आव्हान देखील उभे केले आहे. समाजमाध्यमाने देखील पत्रकारितेचे स्वरुप अधिक लोकाभिमुख केले आहे. डिजिटल साक्षरतेचं प्रमाण अभ्यासण्यासाठी रॉयटरसारख्या वृत्तसंस्थांनी डेटा उपलब्ध करुन देणारी सेवा सुरु केली आहे. संशोधकांनी त्या सेवांचा वापर करुन तथ्यांची मांडणी करावी. डिजिटल युगात वावरतांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ट्रोलर्सकडून होणारी शिविगाळ थांबणे हे मोठे आव्हान बनत असल्याची मांडणी देखील डॉ. मुडे यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात केली.
डिजिटल माध्यमांव्दारे कोरियन सिनेमा, संस्कृती, बीटीएसचा प्रभाव वाढतो आहे. गीत, संगीताचे अनेक चाहते निर्माण झाले आहेत. ओपन अॅक्सेस असलेल्या माहितीचा साठा संशोधकांनी वापरला पाहिजे. फेक न्यूज अर्थात बनावट बातमी आणि माहितीला आळा घालण्यासाठी समाजमाध्यम वापरकर्त्यांनी ती माहिती पडताळून पाहणे अत्यावश्यक आहे. जगभरात समाजमाध्यमांनी सामान्यांचे विश्व व्यापले आहे, याचा फायदा घेऊन अनेकजण आपले अजेंडे तडीस नेत आहेत. यातून बाहेर पडायचं असेल तर समाजमाध्यम साक्षरता वाढली पाहिले, असे मत डॉ. सुंदर राजदीप यांनी आपल्या बीजभाषणातून व्यक्त केले.
अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर म्हणाले की, आजच्या माहिती आणि डिजिटल युगात प्रत्येकाला सायबर विषयक ज्ञान म्हणजेच डिजिटल डिव्हायसेस बाबत साक्षर असणे अत्यावश्यक बनले आहे. आपले इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आणि आपली स्वतःची सुरक्षितता जपणे आज आव्हानात्मक बनले आहे. यामध्ये सहीसलामत राहण्यासाठी सजगता, नैतिकतेचे नियम, सुरक्षितता, कायद्याचे ज्ञान, आव्हाने यांची मूलभूत माहिती प्रत्येकाला असणे ही काळाची गरज आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार डॉ. सचिन नरंगले यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. दीपक शिंदे, भाषा संकुलाचे संचालक डॉ. रमेश ढगे, शिक्षणशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. सिंकुकुमार सिंह, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. बालाजी शिंदे, प्राचार्य डॉ. गणेश जोशी, प्रा. प्रज्ञाकिरण जमदाडे, डॉ. कैलाश यादव, प्रीतम लोणेकर, साहेब गजभारे, डॉ. हर्षवर्धन दवणे, मनोहर सोनकांबळे, इंजि. सम्राट हाटकर, सचिन खंडागळे, सतीश वागरे, विजय हंबर्डे, आसाराम काटकर सह प्राध्यापक, शिक्षक, संशोधक, विद्यार्थी आणि विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड