विजय पाटील
वैजापूर दि .५: येथील बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल सुनील चव्हाण (वय २९) व शिपाई अनंता सूर्यभान बुट्टे (वय ४२) या दोघा लाचखोरांना शुक्रवारी (४ ऑक्टोबर) दुपारी पंचायत समिती परिसरात ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती देण्यासाठी त्यांनी तिघींकडून पैसे घेतले अन् त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने दोघांवर झडप घातली.
वैजापूर तालुक्यातील १८ अंगणवाडी मदतनीसांची पदोन्नती झाली आहे. आचारसंहिता लागण्याआधी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी तसे आदेश काढणे बंधनकारक आहे. मात्र आदेश काढण्यासाठी चव्हाण हा शिपाई बुट्टेच्या माध्यमातून निवड झालेल्या महिलांकडून पैशांची मागणी करत होता. पैसे दिले नाहीतर आदेश मिळणार नाही, दुसऱ्या मदतनीसांची निवड होईल, अशी धमकी देत होता. लाच देण्याची इच्छा नसलेल्या तालुक्यातील ३ मदतनीसांनी संयुक्तरित्या जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
बालविकास प्रकल्प कार्यालयात बुट्टेने चव्हाणच्या समक्ष शहाजतपूर (ता. वैजापूर) येथील मदतनीस महिलेकडून २० हजार आणि आणखी दोघींकडून प्रत्येकी १० हजार असे एकूण ४० हजार रुपये घेतले. लाचेची रक्कम चव्हाणने टेबलमध्ये ठेवताच एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर दोन तास दोघांची झाडाझडती घेतली. ही कारवाई जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांच्यासह गजानन खरात, गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे, गजानन कांबळे, अतिश तिडके, भालचंद्र बिनोरकर यांनी केली.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर