जिल्हाधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे युवा ग्रामीण पत्रकार संघाची मागणी
हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यात शासनाने लाखो, करोडो रुपये खर्चून ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, दोन प्राथमिक आरोग्य केंद्र त्याअंतर्गत १३ आरोग्य उपकेंद्राची उभारणी केली. परंतु येथे आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील गरजू, गरीब रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने येथील रिक्त आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे तात्काळ भरण्यात यावी यासाठी हिमायतनगर तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघाने जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दि. २८ डिसेंबर रोजी युवा ग्रामीण पत्रकार संघांचे तालुकाअध्यक्ष विजय वाठोरे सरसमकर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सविस्तर वृत्तानुसार ग्रामीण भागातील रूग्णांची वेळेवर आरोग्य तपासणी व्हावी त्यांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी तालुक्यात हिमायतनगर येथे ग्रामीण रुग्णालयाची उभारणी केली. तसेच ग्रामीण भागात सरसम, चींचोर्डी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली . सरसम आरोग्य केंद्रांअतर्गत ७ आरोग्य उपकेंद्र असून चींचोर्डी अंतर्गत ६ आरोग्य उपकेंद्र आहेत. यामधे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, नर्स, वाहन चालक, औषध निर्माण अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यासह अशी एकूण ३१ पदांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्याने आरोग्य विभाग ग्रामीण भागातील रूग्णांच्या जीवनाशी खेळ खेळण्याचा डाव खेळत असल्याने हिमायतनगर तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघटना आक्रमक झाली आहे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या ढिसाळ कारभारामुळे येथील अनेक आरोग्य कर्मचारी काढता पाय घेऊन दुसऱ्या ठिकाणी बदली करून जात आहेत. यामुळे आरोग्य कर्मचारी मनमानी पणाने कधीही ये- जा करत आहेत. ग्रामीण, पहाडी, दुर्गम, आदिवासी बहुल भागांतील बेहाल होत आहेत. जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण येत असून त्यांना अतिरिक्त काम करावे लागत आहे.तसेच कोणत्याही आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठाही पुरेसा नाही. पोटा, जवळगाव, कांडली येथील आरोग्य उपकेंद्राचे इमारती रूग्णांना उपचार घेण्या योग्य नसल्याने ती इमारत नव्याने बांधण्यात यावी व मराठवाड्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आरोग्य विभागाकडून नवनवीन उपक्रम राबविले जातात पण आदिवासी बहुल हिमायतनगर तालुका कर्मचाऱ्यां विनाच उपक्रम राबवितो ही अत्यंत गंभीर बाब असुन एक मोठी शोकांतिका आहे.
यामुळे युवा ग्रामीण पत्रकार संघटना हिमायतनगर यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्रातील रुग्णालयात रुग्णांची हेळसांड थांबावी यासाठी थेट जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा दरवाजा ठोठावून येथील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी केली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड