नांदेड दि.२७: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेची लोकसभेच्या १७ उमेदवारांची पहिली यादी पक्ष प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी अखेर बुधवारी (दि. २७ मार्च) सकाळी पत्रकार परिषद घेवून जाहीर केली. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या, पण पक्ष फुटीमुळे आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या तिढ्यामुळे सतत डोक्यावर तलवार लटकत असल्याने अनेकांची झोप उडाली होती. आज जाहीर झालेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमुळे १७ जणांची चिंता मिटली; परंतु अजून ५ उमेदवारांची यादी जाहीर होणे बाकी आहे. कारण उद्धव ठाकरे हे लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ पैकी एकूण २२ जागेवर उमेदवार उभे करणार आहेत. उर्वरित २६ जागा महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मिळाल्या आहेत.
खा. संजय राऊत यांनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत मराठवाड्यातील नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली), चंद्रकांत खैरे (छत्रपती संभाजीनगर), ओमराजे निंबाळकर (धाराशिव) आणि संजय जाधव (परभणी) या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर प्रा. नरेंद्र खेडेकर (बुलढाणा), संजय देशमुख (यवतमाळ वाशिम), संजय वाघेरे पाटील (मावळ), चंद्रहार पाटील (सांगली), भाऊसाहेब वाघचौरे (शिर्डी), राजाभाऊ वाजे (नाशिक), अनंत गीते (रायगड), विनायक राऊत (सिंधुदुर्ग-रत्नागिरी), राजन विचारे (ठाणे), संजय दिना पाटील (मुंबई-ईशान्य), अरविंद सावंत (मुंबई-दक्षिण), अमोल कीर्तीकर (मुंबई वायव्य) यांचा पहिल्या यादीत समावेश आहे तर अनिल देसाई (मुंबई दक्षिण मध्य) यांची उमेदवारी यादीनंतर जाहीर करण्यात आली आहे.
उर्वरित जागेवरील नावेही लवकरच जाहीर करण्यात येतील असे खा. संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कोणतेही वाद नाही, आम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करत आहोत, असे राऊत यांनी म्हटले असले तरी बाळासाहेब आंबेडकरांनी देखील आजच ९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे चर्चेला विराम मिळाल्यात जमा आहे.
मुंबई वायव्यतून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांना ‘इडी’ने समन्स बजावले आहे. त्यांच्यावर कोरोना काळात खिचडी वाटपामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. केंद्र सरकार हे निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षांवर दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड