विजय पाटील लातूर प्रतिनिधी दि १२: चालू खरीप हंगामात दि.१ आणि २ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे उदगीर तालुक्यातील तब्बल ३७,२१६ हेक्टरवरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. पावसाच्या जास्त प्रमाणामुळे शेतात पाणी साचून पीक पिवळे पडल्यामुळे सोयाबीन पिवळे पडून पिकाच्या शेंगा गळून गेल्याचे चित्र तालुक्यात सर्वदूर दिसत आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता तांत्रिक अडचणीमुळे तक्रार होत नाही. सर्वांना ते शक्य नसल्याने फोन करून विमा कंपनीच्या प्रतिनिधींना गावात बोलावले असता त्यांच्याकडूनहीमुद्दाम दुर्लक्ष होत आहे.
तालुका कृषी अधिकारी नाबदे यांच्याशी शेतकरी न्याय मोर्चा व पिकविमा आंदोलनात अग्रस्थानी असणारे गंगापूर-भाकसखेडचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांच्यात चर्चा केली असता, २०२४ चा पिकविमा मिळवण्यासाठी शेतकरी आणि प्रशासन मिळून कोर्टात जाण्याची तयारीबाबत पूर्वतयारी चालू असल्याचे कळवण्यात आले.
चेअरमन विवेक जाधव यांनी असा दावा केला आहे की, नुकसानग्रस्त शेतकऱ्याने ऑनलाइन तक्रार केल्यानंतर ४८ तासात पाहणी करुन, १० दिवसाच्या आत त्याचा अहवाल सादर करणे कंपनीला बंधनकारक असून त्याप्रकारे कसलेच पाऊल उचलले जात नाहीत. जर शेतकऱ्यांना ७२ तासाच्या आत तक्रार केली नसल्यास लाभ मिळत नसेल तर, विमा कंपनीलासुद्धा ४८ तासाच्या आत पाहणी न केल्यामुळे, फोनद्वारे आलेल्या तक्रारी न घेतल्याबद्दल शासनाने दंड लावला पाहिजे. तालुक्यात ४४ हजार हेक्टर वर सोयाबीनची पेरणी झाली असून त्यातील आतापर्यंत ३७ हजार हेक्टर सोयाबीनचे नुकसान झाल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कळवले आहे.
ज्यापद्धतीने बीड,परभणी आदि भागात पंचनामे न करता सरसकट मदत दिली जात आहे, त्याचप्रमाणे उद्घाटन सोहळे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन चालू असलेले जनसंपर्क दौरे बाजूला ठेऊन उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकविमा मिळवून देण्यासाठी निदान या वर्षीतरी उदगीरचे आमदार तथा राज्याचे मंत्री ना.बनसोडे यांनी प्रयत्न करावेत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंतीही आपण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी करत आहोत , असेही जाधव यांनी सांगितले.
सरकार आणि लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे अजून साल २०२३ च्या विम्याचा प्रश्न मिटला नाही, त्याय २०२४ चे नुकसान झाल्याने उदगीर तालुक्यातील शेतकरी आंदोलनाचा परिणाम उदगीरच्या राजकारणावर होणार असल्याचे गंभीर चित्र तालुक्यात दिसणार आहे!
#सत्यप्रभा न्यूज #लातूर