हदगाव प्रतिनिधी / तुषार कांबळे | हदगाव तालुक्यातील तामसा हा परिसर आदिवासी वाड्या, वस्त्या आणि तांड्याची संख्या लक्षणीय असल्याने कामगार, शेतकरी कष्टकरी मजूरदार लोकांची संख्या मोठया प्रमाणावर आहे.या भागांतील लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी या तत्कालीन शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या भागांतील लोकांना आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असणारे एक्स रे मशीन आणण्यासाठी प्रयत्न केले पण आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे ही मशीन धूळखात पडून आहे. यामुळे नागरीकांना नाईलाजाने खाजगी दवाखान्यात जाऊन एक्स रे करिता जादा पैसे मोजावे लागत आहे.
मग प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आलेले एक्सरे मशीन हे काय शोभेसाठी ठेवण्यात आली की काय…? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकाकडून विचारण्यात येत आहे. विशेष म्हणजे जेंव्हा पासुन ही मशिन दवाखान्यात आली तेंव्हा पासुन किती रुग्णांना याचा फायदा झाला असेल हा संशोधनाचा विषय राहील. या बाबत अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधी नी येथील वैदकिय अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी च्या माध्यमातून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मागच्या पावसाळ्यात दवाखान्यात पाणी आल्याने तेंव्हापासून ही मशिन बंद आहे अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली पण प्रत्यक्षात मशिन आली तशी बंदच असल्याचा धक्कादायक प्रकार नाव न छापण्याच्या अटीवर एका विशेष सूत्रांकडून समजला आहे.
यात प्रामुख्याने ही मशिन चालविण्यास प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध नसल्याने ही दुर्दैवी वेळ रुग्णावर आल्याची समजते परंतु आरोग्य प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची दिसून येत आहे.. या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष वेधून एक्स रे मशीन सूरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी रुग्णांकडून करण्यात येत आहे.
“एरवी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येथील आरोग्य केंद्र अग्रेसर असते पण आरोग्याशी संबंधित यंत्रे धूळखात असताना त्यावर कोणतीही कार्यवाही न करणे म्हणजे अनाकलनीय असल्याचे मत रुग्णांकडून बोलल्या जात आहे यावर तालुका आरोग्य अधिकारी काय भुमिका घेतील हे पाहणे गरजेचे आहे “