विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.९ : आजाराला कंटाळून ३२ वर्षीय तरुणाने पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील कर्मचारी निवासस्थानावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. साफसफाई करणाऱ्यांनी त्याला पाहिल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानंतर बोलण्यात गुंतवून ठेवत त्याला हात पकडून वर ओढून घेण्यात आले. हा खळबळजनक प्रकार शुक्रवारी (८ नोव्हेंबर) सकाळी साडेदहाला घडला.
भरत बाबुराव वनारसी (वय ३२, रा. स्वराजनगर मुकुंदवाडी) असे या युवकाचे नाव आहे. तो काही दिवसांपासून फिटच्या आजाराने त्रस्त आहे. शुक्रवारी सकाळी घाटी रुग्णालयात गेला होता. तेथून मिल कॉर्नरच्या दिशेने पायी निघाला. मध्येच पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी निवासस्थानाची मोठी इमारत दिसली. जीव देण्याच्या हेतूने तो इमारतीच्या डी ब्लॉकमधील बी विंगच्या सातव्या मजल्यावर गेला.
खिडकीच्या कॅनपीवर तो बसलेला साफसफाई करणाऱ्यांनी पाहिला. त्यांनी आरडाओरड करून पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावले. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवत काही जण इमारतीवर गेले. तिथून हात पकडून त्याला वर खेचले. त्याला बेगमपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची नोंद बेगमपुरा पोलिसांनी घेतली आहे.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर