विजय पाटील
सिल्लोड दि.३:
सिल्लोडमध्ये भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्यापुढे अडचणींचा मोठाच डोंगर उभा केला आहे. लोकसभा निवडणुकीत सत्तारांनी दानवेंचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर आता दानवेही वचपा काढायला सज्ज झाल्याचे चित्र आहे. यातूनच ऐन दिवाळीत त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे फटाके फुटले. भाजपने सिल्लोडमध्ये युती धर्म पाळला नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोकरदन, कन्नड, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगरात दिसतील, असा इशारा सत्तारांनी दिला. त्यावर दानवे म्हणाले, की सत्तार कोणाला भीती दाखवत आहेत? कन्नड, फुलंब्रीतील मतदारांना गृहित धरू नका. भोकरदनमध्ये तर त्यांचे कुत्रेही ऐकणार नाही. सिल्लोडमधील व्यापारी, शेतकरी दहशतीखाली आहेत. ही रझाकारी दहशत तिथली जनताच मोडून काढणार आहे, असे शरसंधान त्यांनी साधले. विशेष म्हणजे सत्तारांनी गर्भित इशारा देताना कन्नडचे नाव घेतल्याने शिंदे गटाच्या उमेदवारालाच सत्तार पाडणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यातील राजकीय संघर्ष हा आता केवळ दोन मतदारसंघापुरता उरलेला नसून, राज्यभर चर्चेत आला आहे. भाजपचे माजी पदाधिकारी सुरेश बनकर यांनी ठाकरे गटात जाऊन सिल्लोडसाठी उमेदवारी मिळवली. त्यांनी सत्तार यांना आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, भाजपचे पदाधिकारी बनकर यांच्या पाठिशी असल्याचे चित्र आहे. त्यांना रावसाहेब दानवे यांचेही पाठबळ असल्याचे चित्र आहे. ज्या पद्धतीने सत्तारांनी लोकसभा निवडणुकीत युतीधर्म निभावला, त्याच पद्धतीने आम्हीही युती धर्म निभावू असा टोलाच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लगावल्याने एकूणच सत्तारांविरुद्ध भाजप पदाधिकारी सिल्लोडमध्ये आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.
त्यामुळे अडचणीत सापडलेल्या सत्तार यांनी दानवेंना दबावाखाली आणण्यासाठी कन्नडमध्ये खेळी करून पाहिली, पण त्यात फारसे यश आलेले नाही. कारण त्यावर दानवेंनी आधीच कडी करून ठेवली आहे. दानवे यांच्या कन्या संजना जाधव या शिंदे गटाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्या पराभवासाठी सुप्त खेळी करण्यात आली, तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून संजना जाधव यांच्या विजयासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यात आता सत्तार यांनी कन्नडमध्येही परिणाम दिसतील असा इशारा देऊन आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्न केल्याची कबुलीही दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता काय भूमिका पाहतात हे पाहणे रोमांचक ठरणार आहे.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर