नांदेड :झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती (व्हिडिओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या ‘एम.पी.डी.ए.’ कायदा बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके उत्पादक, वितरक आणि विक्रेते यांना लागू करण्यामागील सरकारचा हेतू पैसा गोळा करण्याचा आहे. सदरील प्रकार खंडणी वसूलीचा आहे अशी स्पष्ट भूमिका शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, राधाकिसन गडदे उपस्थित होते.
खते, बियाणे, कीटकनाशके अपराधी अशी दुरुस्ती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावित केली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी किटकनाशके खराब निघाल्यास कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. तसेच किटकनाशकांचे अवशिष्ट घटक, मानवी आरोग्यास धोकादायक आहेत. त्यामुळे पर्यावरण प्रदुषण होते. म्हणून कीटकनाशके उत्पादक, वितरक आणि विक्रेते यांच्यावर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा. तसेच भेसळयुक्त, अप्रमाणित बियाणे, खते यांच्या विक्री आणि वापरामुळे झालेल्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या संवैधानिक ग्राहक मंचाला तिलांजली देऊन तालुका कृषी अधिकारी, अन्वेषण समिती, जिल्हा कृषी अधिकारी आणि कृषी आयुक्त यांच्याकडे नुकसान भरपाई मागण्याची तरतूद प्रस्तावित केली आहे. भ्रष्ट अधिका-यांनी सद् भावना पूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण म्हणून तालुका कृषी अधिकारी, अन्वेषण समिती, आयुक्त किंवा शासनाचा इतर कोणताही अधिकारी किंवा प्राधिकारी यांच्या विरुद्ध कोणताही वाद, खटला किंवा अन्य कायदेशीर कार्यवाही दाखल करण्यात येणार नाही अशी धक्कादायक तरतूद केली आहे. तसेच छगन भुजबळ यांनी आवश्यक वस्तूतील काळाबाजार करणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध ज्या कलमांचा वापर केला जातो. तशी तरतूद कृषी निविष्ठा विक्रेते यांच्यासाठी लागू करण्याचे प्रस्तावित केले आहे. अशी माहिती रघुनाथदादा पाटील यांनी दिली. #सत्यप्रभा न्युज #नांदेड