देगलूर दि.९ : अतिवृष्टी अनुदान 2024 चा निधी मंजूर होऊनही कृषी व महसूल यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे आजतागायत याद्या पूर्ण झाल्या नाहीत. अनेक गावांच्या याद्या या अर्धवट बनविण्यात आल्या. यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहतील अशी भीती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अनेक तांत्रिक अडचणींमुळे 2023 चे अतिवृष्टीचे अनुदानही आजतागायत अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते तथा काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रवक्ते कैलास येसगे कावळगावकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार भरत सूर्यवंशी यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.
अतिवृष्टीच्या अनुदानासोबतच पीएम किसान सन्मान योजनेतील त्रुटी तात्काळ दूर करून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, खरीप 2023 चे पिकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना तात्काळ अदा करण्याचे विमा कंपनीला आदेश द्यावे अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या वरील मागण्या तात्काळ पूर्ण करा; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा धमकीवजा इशारा यावेळी कैलास येसगे कावळगावकर यांनी प्रशासनाला दिला. वरील मागण्या तात्काळ मार्गी लावू असा शब्द यावेळी तहसीलदार भरत सुर्यवंशी यांनी निवेदनकर्त्यांना दिला.
याप्रसंगी कैलास येसगे यांच्यासह गोविंदराव पाटील, शिवकुमार शेटकर, सुभाष कदम, गंगाधर आऊलवार, मारोती पाशमवार, मारोतराव लख्खेकर, गोपाळ मोरे, अँड. महेश देशमुख, अनिल राठोड, विजय पाटील नरंगलकर, महादयाप्पा मठपती, संतोष मिनके, विनोद थडके, संदीप पाटील, कावळगावचे बसवंत पटणे, योगेश बिरादार, शंकर हेडगुळे, सदाशिव झेंगाडे, शेषराव घंटे, संतोष लंजवाडे, राजू देशमुख व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड