नांदेड, आनंदनगर भागातील रहिवाशी श्री अजित रामचंद्र जाधव यांचा आनंदनगर मध्ये प्लॉट नं 68 असुन त्यावर दोन मजलीचे बांधकाम चालू आहे. सदर बांधकामावर लाईटींग व नळ, फर्निचरचे काम चालु असुन त्यासाठी त्यांनी ईलेक्ट्रीशनचे साहित्य फिनोलेक्स कंपनीचे वायर आठ बंडल एकूण 57,500/- रुपयाचा माल व इतर साहित्य खरेदी करुन एका खोलीत ठेवुन त्यास कुलुप लावले होते व त्याचे निगराणीसाठी रात्रीच्यावेळी एक वॉचमेन देखील ठेवण्यात आला होता.
परंतु दिनांक 19.05.2024 रोजीच्या रात्री वॉचमेन रात्री 10.00 ते दिनांक 20.05.2024 रोजीचे 02.00 वा पावेतो डयुटी करुन घरी निघुन गेला त्याच संधीचा फायदा घेवुन एक चोरटा बांधकाम चालू असलेल्या बिल्डींगमध्ये घुसुन खोलीचे कुलुप तोडून आत ठेवलेले फिनोलेक्स कंपनीचे वायर आठ बंडल एकूण किंमती 57,500/- रुपयाचा माल पांढऱ्या रंगाच्या पोत्यासह घेवुन फरार झाला.
या बाबत श्री अजित जाधव यांचे मुनिम श्री शिक्रप्पा ऊर्फ बाबाराव शिवशेट्टे वय 42 वर्ष, रा.श्रीरामनगरहनुमानगड जवळ नांदेड, यांनी दिनांक 20.05.2024 रोजी पोलीस स्टेशन विमातनळ, नांदेड येथे दिलेल्या तक्रारीवरुन गुरनं. 161/2024 कलम 457, 380 भादंवि.प्रमाणेचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याचा तपास गुन्हे शोधपथकाचे जमादार श्री दारासिंग राठोड यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली असता त्यांनी पोलीसस्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जे. एन. मोगल, सपोनि श्री संतोष जोंधळे, यांच्या मार्गदर्शनाखाली बारकाईने तपास केला असता आरोपीने चोरी करतांनाचे फुटेज सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचा पुरावा मिळूनआला. त्यावरुन सदरची चोरी करणारा हा कोण असावा याबाबत आपल्या बुध्दी कौशल्याने चक्रे फिरवली.पोहेकॉ दारासिंग राठोड व पोना/संतोष राणे यांनी आरोपी आकाश उर्फ भैय्या पि. साईनाथ लंगडे वय 20 वर्ष, रा. नवा मोंढा गॅस गोडावुनच्या जवळ झोपडपट्ट नांदेड हा असल्याचे तपासात निष्पन्न करुन त्यास ताब्यात घेवुन जेरबंद केले.नमुद आरोपीची घर झडती घेता त्याच्या घरात गुन्हयातील चोरीस गेल्या माला पैकी एक फिनोलेक्स कंपनीचे वायरचे बंडल मिळून आले. त्यास मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, नांदेड यांचे समक्ष हजर करुन पोलीस कस्टडी घेवुन त्याचा अधिक तपास करता नमुद अरोपीकडून गुन्हयात चोरीस गेलेले फिनोलेक्स कंपनीचे वायर बंडल जप्त करण्यात आले असुन त्याच आरोपीने वेग वेगळया ठिकाणावरुन वेग वेगळया कंपनीच्या नळावर वापरावयाच्या 12 मोटारी चोरलेल्या त्याच्या घर झडतीमध्ये मिळून आल्या असुन त्या पोलीसांनी पंचनामा करुन जप्त केल्या आहेत.सदर गुन्हयातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याने वेग वेगळया ठिकाणी चोऱ्या करुन एकूण 12 नळावर वापरावायाच्या इलेक्ट्रीक मोटारी घरात ठेवलेल्या मिळून आल्या आहेत. सदरची कार्यवाही पो.स्टे. विमानतळचे पोलीस निरीक्षक श्री जे.एन. मोगल, सपोनि.श्री संतोष जोंधळे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ दारासिंग राठोड, हे करीत असुन त्यांच्या मदतीस पोहेकॉ अफजल पठाण, पोहेकॉ शेख जावेद, पोहेकॉ/किशन चिंतोरे, पोकॉ शेख सोयेब, पोकॉ राजेश माने, चालक पोउपनि. श्री भोसीकर, चालक पोकों/साईनाथ सोनसळे, यांनी मदत केली आहे. त्यांच्या या भरीव कामगीरी बद्यल नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार, सहा. पोलीस अधिक्षक श्रीमती किरितीका मॅडम, यांनी प्रशंशा केली आहे. विमानतळ पोलीसांनी आरोपीकडून जप्त केलेल्या 12 ईलेक्ट्रीक मोटारी ह्या कोणाच्या चोरी/गुन्हा दाखल झाला असेल तर पो.स्टे. विमातनळ येथे संपर्क साधावा. असे पोलीसांकडून जनतेस आवाहन करण्यात आले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड