Maharashtra Weather Update: राज्यात फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेच्या (Heat) असह्य झळा जाणवू लागल्याने यंदाचा उन्हाळ्यात तीव्र उष्णतेला समोर जावं लागण्याची भीती असताना भारतीय हवामान विभागाने (IMD) या संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. देशातील अधिकांश भागात मार्च ते मे दरम्यान सामान्यपेक्षा अधिक तापमान (Temperature) राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. मार्च ते मे दरम्यान देशात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून महाराष्ट्रात देखील यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
सध्या राज्यासह देशातील विविध भागांत तापमानाची (Temperature) पातळी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ या भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आज (28 फेब्रुवारी)फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस आहे. तर उद्या मार्च महिना सुरु होणार आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चच्या सुरुवातीच्या दिवसात राज्यातील अंतर्गत भागात 2-3 अंशांनी तापमान वाढणार असल्याचं सांगण्यात आलंय. राज्यभरात तापमानाचा पारा प्रचंड वाढणार असून कोकण गोव्याच्या तापमानात फारसा बदल होणार नसल्याचे ही सांगण्यात येतंय. दुसरीकडे, मार्चच्या पहिल्या आठवड्यात मध्य प्रदेशात ढगाळ आकाश आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम-उत्तर भारतात 2 मार्चपासून वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे. त्याचा परिणाम राज्यातही दिसून येत आहे. विशेषत: 4 मार्चपासून इंदूर, ग्वाल्हेर आणि चंबळ भागात काही ठिकाणी हवामान बदलू शकते. याआधी दिवसा आणि रात्रीच्या तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होणार आहे.
पावसाळ्यापूर्वी रस्ते काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण करा- अभिजीत बांगर
बृहन्मुंबई महानगरपालिकेने सक्षम पायाभूत सुविधा विकासावर भर दिला आहे. या अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण कामे वेगाने सुरु आहेत. त्यामुळे रस्त्यांचे जाळे अधिक वाढणार असून प्रवास सुकर होणार आहे. मात्र, काँक्रिटीकरण कामे करताना ‘जंक्शन टू जंक्शन’ (एखाद्या चौकापासून दुसऱ्या चौकापर्यंतची जोडणी) या पद्धतीनेच झाली पाहिजेत. जर दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत काम होणार नसेल तर विनाकारण नवीन खोदकाम केले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. विहित कालावधीतच गुणवत्तेनुसार रस्ते कामे करावीत. विलंब कदापी खपवून घेणार नाही, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. रस्ते काम सुरु असताना बॅरेकेडिंग (रस्तारोधक) योग्य पद्धतीने करावी, जेणेकरून वाहतुकीसाठी अधिकाधिक रस्ता खुला राहू शकेल, असेदेखील निर्देश ही बांगर यांनी दिले आहेत.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत रस्ते काँक्रिटीकरणाची कामे अत्युच्च गुणवत्ता कायम राखून वेगाने पूर्ण करावीत. ‘जंक्शन टू जंक्शन’ या पद्धतीनेच रस्ते जोडणी केली पाहिजे. त्यासाठी नियोजित वेळापत्रक आणि उपलब्ध मनुष्यबळ, साहित्यसामुग्री यांची सांगड घातली पाहिजे. काँक्रिटीकरणाचे सुरु असलेले काम प्राधान्याने पूर्णत्वास न्यावे. विलंब, दिरंगाई होणार नाही, याची विशेष खबरदारी घ्यावी.
‘रेडी मिक्स काँक्रिट प्लांट’ ते प्रकल्पस्थळ दरम्यान वाहतुकीचे अंतर, तापमान यांचा विचार करून मालाचा दर्जा सुयोग्य रहावा, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देतानाच श्री बांगर म्हणाले की, कार्यस्थळी नागरिकांसाठी प्रदर्शित केलेल्या माहितीफलकावर काम सुरु केल्याचा दिनांक, काम संपुष्टात येण्याचा दिनांक, कामाचा एकूण कालावधी, रस्त्याची लांबी, रुंदी आणि काम कोठून कोठेपर्यंत केले जाणार आहे आदींची माहिती अगदी ठळकपणे नमूद करावी. विशेषत: रस्ते काम सुरु असताना बॅरेकेडिंग (रस्तारोधक) योग्य पद्धतीने करावी, जेणेकरून नागरिकांना रस्त्याचा अधिकाधिक वापर वाहतुकीसाठी करता येईल, असेदेखील निर्देश बांगर यांनी दिले.