छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ! विजय पाटील !
दि : ०८/०२/२०२४
तलाठी व त्याचा पंटर एजंट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. वाळूच्या ट्रक्टरवर कारवाई न करण्यासाठी एजंटला ८ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी तलाठीने लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
1) सुरज सिंग त्रिंबक सिंग राजपूत, वय 40 वर्ष, व्यवसाय नोकरी, पद तलाठी, (वर्ग 3)* नेमणूक – उपविभागीय कार्यालय पैठण जिल्हा संभाजीनगर राहणार विना सोसायटी, जटवाडा रोड, छत्रपती संभाजी नगर, 2) संभाजीराव नंदू शिंदे, वय 30 वर्ष, व्यवसाय शेती व चालक, राहणार बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशी आरोपींची नावे आहेत.
दिनांक 3/2/2024 रोजी आरोपी तलाठी सुरज सिंग राजपूत यांना खाम नदीवर तक्रारदार यांचे पाणी भरण्याचे व वाळू धुवून देण्याचे ट्रॅक्टर आढळून आले. त्यावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी मध्यस्थी खाजगी व्यक्ती संभाजीराव नंदू शिंदे यांच्या मदतीने तक्रारदाराकडे 10000/- रुपये दरमहा हप्ता बक्षीस म्हणून लाच मागितली. त्याप्रमाणे दि.7/2/2024 रोजी मध्यस्थी संभाजी शिंदे यांनी तक्रारदारास पंचासमक्ष लोकसेवकाकरीता लाच मागून व तडजोड करून 8000/- रुपये लाच मागितली व लोकसेवकाशी समक्ष बोलणे करून दिले तेव्हा लोकसेवकाने त्या गोष्टीस प्रोत्साहन दिले.
त्यानंतर मध्यस्थी खाजगी व्यक्ती संभाजीराव शिंदे याने पंचासमक्ष 8000/- रुपये लाच रक्कम स्वीकारली, त्यास रंगेहाथ पकडण्यात आले असून पो.स्टे. बिडकीन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, राजीव तळेकर, पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, सापळा अधिकारी – राहुल फुला, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – पोना राजेंद्र सिनकर, चा. पो. अं, चांगदेव बागुल यांनी पार पाडली.
सत्यप्रभा न्यूज