मुंबई दि.५: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास तयार झाले आहेत, त्यामुळे गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेले राजकीय असंतोषाचे नाटक अखेर संपले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी स्पष्ट केले होते की, जर शिंदे उपमुख्यमंत्रीपद न स्वीकारले तर ते मंत्रिपद स्वीकारणार नाहीत. त्याचा परिणाम म्हणून शिंदे यांनी सहमती दर्शवली आहे.
मुख्यमंत्रीपदावर अडीच वर्षे काम केल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री होण्यास शिंदे तयार नव्हते, परंतु त्यांनी अखेर निर्णय बदलला आहे, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली. निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने शिंदे नाराज होते, तसेच त्यांनी गृहमंत्री आणि अर्थमंत्री पदांची मागणी केल्याचे वृत्त होते. मात्र, भाजपाने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नव्हता.
आता शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असले तरी त्यांना कोणते खाते मिळणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सह्याद्री अतिथीगृहावर येणार असून, तिथे शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. या बैठकीत खातेवाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांचा शपथविधी पार पडेल. त्यामुळे यापुढे आणखी राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी, ज्यात उदय सामंत, भरत गोगावले, संजय शिरसाट, दीपक केसरकर, आणि संजय गायकवाड यांचा समावेश होता, वर्षा बंगल्यावर जाऊन शिंदेंची समजूत काढली आणि त्यांना सहमतीस तयार केले.
#सत्यपप्रभा न्युज #मुंबई