संगणक आणि प्रयोगशाळेचे उद्घाटन, विद्यार्थ्यांशी संवाद
नांदेड, दि ४ : ग्रामीण भागाच्या विकासासाठी तांत्रिक शिक्षण कायापालट करणारे माध्यम ठरू शकते. जगातील सर्वात मोठे स्टार्टअप केंद्र सध्या महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तांत्रिक शिक्षणाच्या उपलब्धतेतून सक्षम देश उभारणीचा पाया घालणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन राज्याचे मृदसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज येथे केले.
नांदेड येथील ग्रामीण टेक्नीकल अॅन्ड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णूपुरी व कंधार येथील तांत्रिक व कृषी महाविद्यालयात भेट दिल्यानंतर नांदेड येथे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संजय पवार,प्राचार्य डॉ. विजय पवार,जिल्हा मृद संधारण अधिकारी हनुमंत खटके, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी एल. शरमन, श्रीमती मीनाताई पवार,डॉ. राजेंद्र पवार, प्रोफेसर डॉ. पी. बी. उल्लागडी,उपप्राचार्य संजय देऊळगावकर,विभाग प्रमुख प्रा. गुरुदीपसिंघ वाही, डॉ. निलेश आळंदकर, डॉ. सुनिल कदम, प्रा. देवयानी कापसे तसेच मंत्री महोदयाच्या सुविद्य पत्नी शीतल राठोड उपस्थित होत्या.
बांधकाम क्षेत्र,संगणक क्षेत्र, दोन्ही विभाग देशाच्या जडणघडणीत महत्व ठेऊन आहे. या दोन्ही क्षेत्रात करियर घडविण्यास अग्रेसर असणारे विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहे.मराठवाडा परिसरातील ही एक चांगली संस्था आहे.सिव्हील व संगणक क्षेत्रात भरारी घेऊन आपल्या प्रदेशासाठी देशासाठी काम करणे आवश्यक आहे, मोठमोठ्या स्टार्टअप या क्षेत्रात सुरू करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मृद व जलसंधारण खात्याची माहिती यावेळी दिली. या विभागाच्या गेल्या काही दिवसातील उल्लेखनीय कामामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढत आहे. कोणत्याही गावात पाणीटंचाई राहणार नाही अशा पद्धतीची मृदसंधारणाची कामे आपल्या विभागाने हाती घेतली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या . संस्थेचे संस्थापक सचिव कै. शिवरामजी पवार साहेबाना अभिवादन केले. त्यांच्या दूरदृष्टीतून नांदेड सारख्या शहरात तांत्रिक शिक्षणाचा वटवृक्ष उभा राहिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. ओमप्रकाश दरक यांनी केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड