‘आर्टी ‘ची मागणी पूर्ण केल्याबद्दल राज्यस्तरीय मातंग समाजाच्या मेळाव्यात शासनाचे आभार
ना. देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्यावतीने समाज बांधवांतर्फे स्वीकारला सत्कार
नांदेड दि. १० : अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे (आर्टी )ची स्थापना झाली आहे. आरक्षणाचाही प्रश्न लवकरच निकाली निघेल.राज्य शासन मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यास वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले. मुखेड येथे कै. गोविंदराव राठोड सभागृह क्रीडा संकुल येथे या कार्यक्रमाचे आयोजण करण्यात आले होते.
आज नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात राज्यातील समस्त मातंग समाजाच्यावतीने राज्यस्तरीय समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये राज्य शासनाने ‘आर्टी ‘ची मागणी पूर्ण केल्याबद्दल राज्य शासनाचे मातंग समाजाच्या धुरीनांकडून जाहीर आभार व्यक्त करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी समाजाकडून जाहीर सत्कार स्वीकारला.
या कृतज्ञता सोहळ्याला मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह आ.डॉ. तुषार राठोड,आ.बालाजी कल्याणकर, माजी खासदार हेमंत पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आ. सुभाष साबणे, माजी आ. अविनाश घाटे, माजी आ. राम पाटील रातोळीकर, मा.मुख्यमंत्री महोदयाचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर,आयोजक नारायणराव गायकवाड यांच्यासह महाराष्ट्रातील मातंग समाज संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. १ ऑगस्टला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती महोत्सवानिमित्त अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)या संस्थेचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले.
राज्यातील मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक, विकास करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना करण्याची मागणी मातंग समाजाची होती. आझाद मैदानामध्ये यासाठी आंदोलनही झाले होते.ही मागणी पूर्ण झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील सामाजिक कार्यकर्ते नारायणराव गायकवाड यांच्या पुढाकारात समस्त मातंग समाज बांधवाकडून महाराष्ट्र सरकारचे जाहीर आभार व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.
यावेळी बोलताना शंभूराज देसाई यांनी राज्य शासन मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. मातंग समाजाने आझाद मैदान येथे ज्या ज्या प्रमुख मागण्या मागितल्या होत्या. त्या मागण्या जवळपास पूर्ण झाल्या असून अन्य मागण्याही कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात शासन कटीबद्ध असल्याचे सांगितले.
आझाद मैदान येथील मातंग समाजाच्या आंदोलनातील आपल्या आश्वासनानंतर व त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला आहे.अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना झाली असून गोवंडी ( मुंबई ) येथे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. अंतर्गत आरक्षण अबकड गटाचा प्रश्न सोडविण्यासाठी सुरुवातीला अभ्यास गट गठीत करून ज्या राज्यामध्ये हे आरक्षण देण्यात आले होते. तेथील अभ्यास करण्यात आला. आरक्षण विषयक अंतर्गत वर्गवारी न्यायालयाच्या निर्देशानंतर पूर्ण केल्या जाईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी या विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.तुषार राठोड यांनी ‘आर्टी ‘साठी आपण सभागृहात बोललो होतो. त्याची पूर्तता झाल्याचे समाधान आहे, असे सांगितले. मुखेड एमआयडीसीचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. तसेच लेंडी नदीवरील प्रकल्प पूर्णत्वास नेण्याबाबतही पाठपुरावा करण्याची विनंती केली.
मुखेड -देगलूर परिसरातील भूमिपुत्र आणि मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी ‘आर्टी ‘च्या माध्यमातून समाजाच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी देखील यावेळी समाजाने आपला शैक्षणिक आलेख वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. माजी खासदार हेमंत पाटील यांनीही यावेळी संबोधित केले. तसेच समाजाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.या कृतज्ञता सोहळ्याला राज्यभरातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध गायिका कोमल पोटाळे यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड