सिरजखोड रस्त्यावरील नवीन पुलाला पडल्या भेगा
दत्तात्रय सज्जन धर्माबाद दि.३ : शहरापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे सिरजखोडला जाणाऱ्या रस्त्यावर नुकतेच बनवण्यात आलेल्या पुलाच्या मधोमध उभी भेग पडली असून नवीन पुलाला अल्प कालावधीत भेगा पडल्याने सदर काम निकृष्ट झाल्याची ठळक प्रचिती येत आहे.
ग्रीन फील्ड शाळेत सिरज खोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर टी पॉइंट पासून साधारण एक किलोमीटर अंतराच्या आत पोल्ट्री फार्म जवळ रस्त्यावर एक लहान पूल बांधण्यात आले आहे मात्र या पुलाचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे न करता कमी दर्जाचे मटेरियल वापरून निकृष्ट केल्याचे दिसून येत आहे. परिणामतः सहा महिन्यांपूर्वीच बांधलेल्या या पुलाच्या मधोमध उभी भेग पडली असून येणाऱ्या काळात लवकरच पुलाची अवस्था दयनीय होईल, यात शंकाच नाही. विशेष म्हणजे या रस्त्याने सिरजखोड, बामणी,मनुर,संगम तसेच गोदावरी मांजरा नदीच्या पवित्र संगमावर असलेले श्री संगमेश्वर मंदिर या ठिकाणांकडे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची नेहमी वर्दळ असते, तसेच सदरील रस्ता आलूर- बेल्लुर मार्गे आंतरराज्य महामार्गाला जोडतो. त्यामुळे सदरील कामाचे गांभीर्य लक्षात घेता निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी करून संबंधित गुत्तेदारावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे धर्माबाद तालुकाध्यक्ष दत्तात्रय सज्जन सिरजखोडकर यांनी लेखी निवेदनाद्वारे उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग धर्माबाद यांच्याकडे केली आहे. यावेळी दत्तात्रय सज्जन, संजय झगडे, राजेश सोनकांबळे, गंगाप्रसाद सोनकांबळे आदी उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड