नांदेड़ दि.२६ : प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहम्मद बदियोदिन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मा.पंतप्रधान महोदयांनी सन 2025 मध्ये भारत देश क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय ठेवलेले आहे. त्यासाठी राज्यात वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येत असुन त्याअनुषंगाने सन 2023 मध्ये 15 जानेवारी 2023 च्या अहवालानुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने 89.17 गुण प्राप्त करून राज्यात 22 महानगरपालिका व 38 जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे डॉ.मोहम्मद बदियोदिन,शहर क्षयरोग अधिकारी, यांचा राज्यस्तरावर यशदा,पुणे येथे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या उत्कृष्ट कार्याने नांदेड महापालिकेचे नाव उंचावले असुन या उत्कृष्ट कार्याबद्दल आज प्रजासत्ताक दिनी आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी त्यांचा विशेष सत्कार केला.
तसेच मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या संकल्पनेतून महापालिकेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना Officer of the month व Employee of the month हा पुरस्कार देण्यात येतो. माहे ऑक्टोबर मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल Officer of the month हा पुरस्कार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुरेशसिंह बिसेन यांना आयुक्तांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच Employee of the month साठी वसुली लिपिक लखन कुंटे यांची निवड करून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पंधराव्या वित्त आयोगा आयोगांतर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत 12 आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करून शहरातील विशेषतः झोपडपट्टी भागातील नागरिकांना दुपारी २.०० ते रात्री १०.०० या वेळेत मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली तसेच आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आली. नागरी शहरी आरोग्य अभियान अंतर्गत मोफत सोनोग्राफी सेवा, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, जननी सुरक्षा योजना, कुटुंब कल्याण इत्यादी योजना नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यास डॉ.बिसेन यांनी विशेष कार्य केले आहे. नांदेड शहरांमधील PCPNDT कायद्यांतर्गत शहरातील सर्व नोंदणीकृत खाजगी वैद्यकीय संस्थायीक यांच्या संस्थांची नियमित तपासणी करून शहरांमध्ये स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर बाबत अद्यावत नोंदी ठेवण्यामध्ये सुद्धा डॉ.बिसेन यांचा विशेष पुढाकार राहिलेला आहे. डॉ.बिसेन यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांना Officer of the month म्हणून घोषित करून त्यांना आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा प्रजासत्ताक दिनी सत्कार करण्यात आला आहे.
तसेच महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालय क्र.4 वजिराबाद मध्ये कार्यरत असलेले वसुली लिपिक श्री लखन कुंटे यांना माहे ऑक्टोबर 2023 मध्ये मालमत्ता कर वसुली करण्याचे उद्दिष्ट ५७.०० लक्ष असे देण्यात आले होते त्या अनुषंगाने संबंधिताने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून रुपये ७४.०० लक्ष एवढी विक्रमी मालमत्ता कराची वसुली केली असल्याने श्री कुंटे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांना Employee of the month म्हणून घोषित करून त्यांना आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ त्यांचा प्रजासत्ताक दिनी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मनपाचे माजी पदाधिकारी व माजी सन्माननीय सदस्य तसेच अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त कारभारी दिवेकर,उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे, उपायुक्त निलेश सुंकेवार तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून डॉ.मोहम्मद बदियोदिन, डॉ.सुरेशसिंह बिसेन व वसुली लिपिक लखन कुंटे यांचा मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते सत्कार व सन्मान झाल्याबद्दल उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधितांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड