विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.२८ :शहरात पराभूत झालेल्या उमेदवारांना अजूनही जनतेचा कौल मान्य झाल्याचे दिसत नाही. ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील पराभूत उमेदवार राजू शिंदे आणि मध्य मतदारसंघाचे बाळासाहेब थोरात यांनी ईव्हीएम मशिनवर पराभवाचे खापर फोडायला सुरुवात केली आहे. त्यांनी ५ केंद्रांतील मतांच्या मोजणीची मागणी केली आहे. यासंदर्भातील वृत्त आजच्या अंकात एका प्रसिद्ध दैनिकाने दिले आहे.
शिरसाट यांना मतदान मिळण्याची शक्यता नाही अशा ठिकाणीही त्यांना मतदान झाले असून, यामुळे ५ केंद्रांतील मतांच्या मोजणीची मागणी करणार आहे, असे राजू शिंदे यांनी म्हटले आहे, तर हर्सूलसह काही भागांत माझे हक्काचे मतदान होते. तिथेही मला कमी मतदान झाले. त्यामुळे मीही व्हीव्हीपॅटच्या मतमोजणीसाठी अर्ज करणार असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाची शहरात मुस्लिम मतांवर मोठी मदार होती. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते. मात्र एमआयएमला एकगठ्ठा ही मते पडली. भाजप आणि शिंदे गट मिळून आम्हाला मुस्लिम मते मिळू नये म्हणून प्रयत्न करत असल्याचा आरोपही जाहीररित्या आ. अंबादास दानवे यांनी केला होता.
शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी शिंदे आणि थोरात यांच्या मागणीवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की पराभूत उमेदवारांना जनतेने नाकारले आहे. राजू शिंदे यांनी ५ नाही तर ५० ठिकाणचे मतदान मोजावे. त्यांनी जनमताचा सन्मान करावा म्हणजे मानसिक त्रास कमी होईल, असे जंजाळ म्हणाले.
जिल्ह्यातील सर्वाधिक धक्कादायक निकाल सिल्लोडचा आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचे सुरेश बनकर उमेदवार होते. यंदा ते निवडून येतील, अशी शक्यता असताना अब्दुल सत्तार आले. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या मतदारससंघातील निकालाविरुद्ध त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
कुणाला किती मते?
छत्रपती संभाजीनगर मध्य : बाळासाहेब थोरात ३७,०९८, तर प्रदीप जैस्वाल ८५,४५९
छत्रपती संभाजीनगर पश्चिम : राजू शिंदे १,०६,१४७, संजय शिरसाट १,२०,००९
सिल्लोड : सुरेश बनकर १,३५,५४०, अब्दुल सत्तार १,३७,९६०
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर