सत्यप्रभा न्यूज | नांदेड | श्रीराम नवमी मिरवणूक बंदोबस्त शांततेत पार पाडावा यासाठी नांदेड शहरातील ल सर्व ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची सर्वोतोपरी काळजी घेण्यात आली. श्रीराम नवमी बंदोबस्त कामी जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली २ अपर पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी, १२४ सपोनि / पोउपनि, पोलीस अंमलदार, राज्य राखीव दलाच्या दोन दल, महिला पोलीस अंमलदार, २२१ महिला होमगार्ड, ३१ अधिकारी, १ हजार ५५ पोलीस, ५ आरसीपी प्लाटून आणि ८९१ पुरूष होमगार्ड तैनात करण्यात आलेत.
श्रीराम नवमी मिरवणूक बंदोबस्त अनुषंगाने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील सहा पोलीस स्टेशन अंतर्गत तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सर्व श्रीराम नवमी मिरवणुक समितीची, शहरातील सर्व समाजातील व्यक्तींची एकत्ररित्या मीटींग घेण्यात आली. यावेळी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. नांदेड पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह राम नवमी बंदोबस्तासाठी इतर जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त ही रविवारी नांदेडमध्ये तैनात राहणार आहे. नांदेड परिक्षेत्रातून श्रीराम नवमी मिरवणुकीकरीता लातूर जिल्ह्यातील ५ अधिकारी, ५० पुरूष अंमलदार, परभणी जिल्ह्यातून ४ अधिकारी, २७ पुरुष अंमलदार आणि हिंगोली जिल्ह्यातून ४ अधिकारी,३६ पुरुष अमलदार आणि चार महिला अंमलदार असा बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
नांदेड शहरामध्ये श्रीराम नवमी मिरवणुकीच्या अनुषंगाने योग्य तो पोलीस बंदोबस्त सर्व पाईंटवर लावण्यात आला आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून ठिकठिकाणी १०० सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आलेले आहेत. सर्व जनतेने श्रीराम नवमी मिरवणुकीत शांतता राखावी आणि काही अनुचित प्रकार कोठे घडत असल्यास किंवा आढळून आल्यास डायल 112 अथवा स्थानिक पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचवेळी कोणीही कायदा हातात घेतल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरामध्ये स्थानिक पोलीस, आरसीपी, एसआरपी व नांदेड पोलीस परिक्षेत्रातून बंदोबस्तकरीता आलेले अधिकारी अंमलदार यांचे पथसंचलन (रूटमार्च) काढण्यात आला तसेच शहरात शांतता अबाधित राखण्यासाठी एकत्रिक संयुक्तरित्या सर्व पोस्टे स्तरावर सुनियोजित पध्दतीने इतर सुरक्षा विषयक उपाययोजना राबविण्यात आली आहे.