भाजपाची धर्माबाद नगरपारिषद प्रशासनाकडे मागणी
धर्माबाद ता. प्र.दत्तात्रय सज्जन दि.२४: शहराच्या दुतर्फा अगदी आद्ययावत झालेल्या राज्य रस्त्यावर आज घडीला रात्रीला सर्वत्रच अंधाराचे साम्राज्य पसरत असून त्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळत आहे. त्यामुळे सदरील दुतर्फा रस्त्यावर पथदिवे बसवण्याची अगदी रास्त मागणी भारतीय जनता पार्टी धर्माबादचे शहराध्यक्ष रमेश अण्णा गौड यांनी एका लेखी निवेदनाद्वारे नगरपालिका प्रशासनास केली आहे.
महावीर चौक ते लालबहादूर शास्त्री महाविद्यालय कमान, शिव टेकडी, रामनगर चौरस्ता, तेलंगाना बस स्थानक, पोलीस उपविभागीय अधिकारी, पाटील पेट्रोल पंप हा तेलंगणातील बासर तीर्थक्षेत्राकडे जाणारा रस्ता अगदी आद्ययावत झाला असून या रस्त्यावर मात्र अंधाराचे साम्राज्य आहे. तद्वतच महावीर चौक ते फुले नगर, छत्रपती चौक, रेल्वे गेट क्रमांक-२, रत्नाळी, शंकरगंज, महाराष्ट्र बस स्थानक ते थेट टी पॉइंट हा जन्मभूमी ते कर्मभूमी राज्य रस्ता अगदी अद्ययावत झाला असून या रस्त्यावर सुद्धा अंधाराचे साम्राज्य आहे.
नगरपालिका प्रशासनाने मुख्याधिकारी सतीश पुदाके यांच्या संकल्पनेतून नवनवीन उपक्रम राबवणे चालू केले असून महावीर चौकामध्ये नुकतेच आय लव्ह धर्माबाद हा डिजिटल सेल्फी पॉईंट बसवण्यात आला आहे.
सदरील प्रमुख रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना खतपाणी मिळत आहे. मुलींच्या छेडखानी घटनेत वाढ होत आहे. चोरीचे प्रमाण वाढत आहे. तद्वतच सदरील रस्ते गुळगुळीत झाल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघातही होत आहेत. जर का सदरील रस्त्यावर दोन्ही बाजूस पथदिवे जर बसवले तर गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा तर बसेलच आणि धर्माबाद शहराच्या सौंदर्यात भर पडून आख्खे शहर उजळून जाईल.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड