
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ! विजय पाटील !
दि : ०८/०१/२०२४
ग्रामीण विकासाला साह्यभूत असणाऱ्या रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात येणारी कामे मार्च अखेर पूर्ण करावेत, असे निर्देश राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिले.
पैठण तालुक्यातील ४२ गावांचा व विविध विकास कामाचा आढावा जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेण्यात आला. जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, रोहयो उपजिल्हाधिकारी अर्चना खेतमाळीस, उपायुक्त नंदा गायकवाड, उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ, गटविकास अधिकारी मीना रावताळे, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह सरपंच व संबंधित अधिकारी कर्मचारी आढावा बैठकीस उपस्थित होते.
रोहयोअंतर्गत मंजूर कामे मार्च अखेर प्राधान्याने पूर्ण करावेत अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. कारोड, आडगाव खुर्द, एकोड, नायगाव, धारधोत, भालगाव,आपतगाव चितेगाव, चित्ते पिंपळगाव, पाचोड, डायगव्हाण, गारखेडा, घारेगाव, पिंपरी, कचनेर,खोडेगाव या गावाबरोबर इतरही गावातील रोजगार हमी योजनेच्या कामांविषयीचा आढावा घेण्यात आला.
घरकुल, जनावरांचा गोठा, पेव्हर ब्लॉक बसवणे, वृक्ष लागवड, मातोश्री पाणंद रस्ता, रोपवाटिका, सिंचन विहीर, शाळेला संरक्षण भिंत, शेततळे, साठवण तलाव इ. कामांचा आढावा घेण्यात आला. मंजूर कामांच्या पूर्ण होण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून ग्रामस्थ, कनिष्ठ अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ही कामे वेळेत पूर्ण करावेत व उद्दिष्ट पूर्ण करावे,असे निर्देश त्यांनी दिले.
सत्यप्रभा न्यूज