नांदेड दि.१: महिला सक्षमीकरण तसेच मुलींच्या विकासाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात बालिका पंचायत उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे.
बेटी बचाओ- बेटी पढाओ या अभियानांतर्गत आज गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बालिका पंचायत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, महिला व बाल विकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार आदींची उपस्थिती होती.
पुढे त्या म्हणाल्या, भविष्यात मुलींच्या सामाजिक आणि राजकीय विकासाला प्रोत्साहन देणे आणि त्यांचा राजकारणात सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे तसेच बालविवाह आणि हुंडा यासारख्या प्रथा तसेच स्त्री पुरुष असमानता समाजातून काढून टाकणे हे बालीका पंचायत उपक्रमाचे उद्देश आहेत.
यामध्ये पारंपारिक ग्रामपंचायती प्रमाणेच बालिका पंचायत असेल. गावातील 11 ते 21 वयोगटातील बालिकांची बालिका पंचायत निवडणूकद्वारे निवडून देणे, त्या अध्यक्ष व सचिव असतील. तसेच मुलींना ग्रामपंचायतीमधील घटनात्मक अधिकार आणि जबाबदार समजून सांगितल्या. जेणेकरून भविष्यकाळात सामाजिक आणि राजकारणामध्ये देखील महिला पुढे येणे गरजेचे आहे. यासाठी हा उपक्रम जिल्ह्याती राबवला जाईल. या उपक्रमातून मुलींना नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध होईल असेही त्या म्हणाल्या. बालविवाह, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण याकडेही लक्ष दिले जाणार असत्याचे त्यांनी सांगितले. तसेच या उपक्रमांतर्गत उत्कृष्ट बालिका पंचायत व बालिका मंच तयार करणाऱ्या दोन ग्रामपंचायतींना 4 जून रोजी पुरस्कार देण्यात येईल. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी बालिका पंचायत सेल्फी पॉइंट तयार करावे. दिनांक 3 जून रोजी जिल्ह्यातील उत्कृष्ट पाच बालिका पंचायतींना स्वतः भेट देवून त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी माँ जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी
विविध तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीने सीईओ मीनल करनवाल यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी महिला सक्षमीकरणा विषयी सरपंचांची मत ऐकून त्यात्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्तावित उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांनी तर सूत्रसंचालन मिलिंद व्यवहारे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील निवडक सरपंच व ग्रामसेवक यांची उपस्थिती होती.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड