नांदेड दि. 4 :गुंतवणूक वृध्दी, व्यवसाय सुलभीकरण, निर्यात, एक जिल्हा एक उत्पादन व एमएसएमई क्षेत्राबाबत उद्योजकांना माहिती व्हावी. तसेच राज्य व केंद्र सरकारची धोरणे व उपक्रमाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत 6 डिसेंबर 2023 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे अध्यक्षतेखाली हॉटेल चंद्रलोक, महाराणा प्रताप चौक, नांदेड येथे सकाळी 9.30 वा. आयोजित करण्यात आलेली आहे.
या कार्यशाळेसाठी जिल्हयातील सर्व औद्योगिक संघटना, नामांकित उद्योजक, उद्योजक व्यवसायाशी संबंधीत सर्व शासकीय विभाग व संस्था यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.
या कार्यशाळेचा उद्देश हा नांदेड जिल्हयातील उद्योजकांचे उत्पादन जागतिक बाजारात नेणे हा आहे. तसेच स्थानिक उत्पादनांची गुणवत्ता वाढविणे, निर्यात प्रक्रिया, खरेदीदार आणि विक्रेते शोधणे, निर्यात कर्ज आणि अनुदान योजना, पॅकिंग व ब्रॅडींग, आवश्यक चाचण्या इ. विषयांवर या कार्यशाळेत चर्चा होणार आहे.
या कार्यशाळेचे सीडीबीआय, आयडीबीआय, कॅपिटल हे मुख्य प्रायोजक आहेत. याशिवाय उद्योग संचालनालय, मुंबई अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र नांदेड व इतर निगडीत विभागाचे संबंधित अधिकारी, तज्ञ मान्यवर कार्यशाळेत उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील औद्योगिक संघटना, निर्यातदार, नामांकित उद्योजक, उद्योजक व्यवसायाशी संबंधीत सर्व शासकीय विभाग, महिला स्वयं सहाय्यता बचत गटाचे सदस्य निर्यातीशी संबंधीत अधिकारी व केंद्र व राज्य शासनाचा अनुदान योजनेचा लाभ घेतलेल्या यशस्वी उद्योजक यांचा सहभाग राहणार आहे, असे जिल्हा उद्योग केंद्राने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड