अमित देसाई
ठाणे दि.२४: प्रभाग क्र. २२ मधील नागरिकांपर्यंत राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना पोहोचविण्यासाठी, शिधापत्रिकेत आवश्यक बदल करण्यासाठी, नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी व स्थानिकांना अनेक योजनांचे कार्ड वाटण्यासाठी निखिल सतीश बुडजडे यांच्या माध्यमातून भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला दोन हजारांहून अधिक स्थानिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
टेंभीनाका परिसरातील नवीन SRA प्रकल्पात वास्तव्यास आलेल्या नागरिकांना आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. येथील लोकांना सरकारी कार्यालयात चकरा मारून आपल्या चपला झिझवाव्या लागत होत्या. SRA च्या एका इमारतीत जवळपास ३०० लोकवस्ती असल्याने ४ SRA प्रकल्पात सुमारे १२०० पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. या स्थानिक नागरिकांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी निखिल बुडजडे यांनी SRA इमारतीच्या परिसरातच सरकारी योजना व नागरी सेवेच्या शिबिराचं आयोजन केलं. यामुळे येथील रहिवाशांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.
शिधापत्रिकामध्ये नावं वाढवणे, नाव कमी करणे, शिधापत्रिका हरवले किंवा खराब झाले असल्यास त्यांना दुसरी प्रत देण्यासाठी या नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच स्थानिकांना मोफत ई-श्रम कार्ड, नवीन मतदान कार्ड, जेष्ठ नागरिक कार्ड, आयुष्यमान कार्ड सर्वकाही मोफत काढून देण्यात आले. विशेष म्हणजे प्रभाग क्र. २२ मध्ये नव्याने वास्तव्यास आलेल्या नागरिकांसाठी आणि नव मतदातांसाठी नवीन मतदान नोंदणी शिबिरही भरविण्यात आले. निखिल बुडजडे यांच्यामुळे या सर्व नागरिकांना येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या कल्याणकारी शिबिराला प्रभाग क्र. २२ मधील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. लाभार्थी नागरिकांना लवकरच वरील कागदपत्रे देण्यात येणार आहेत.
नागरिकांच्या शिधारपत्रिकांच्या समस्या असतात तसेच या शिधापत्रिका अपूर्णही असतात. यामुळे एखादा महत्वाचा अर्ज दाखल करताना शिधापत्रिकेची सत्यप्रत देताना अडचण होते. प्रभाग क्र. २२ मधील स्थानिकांची हीच समस्या लक्षात घेऊन निखिल बुडजडे यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. चरई, उथळसर आणि खारकर आळी आशा तीन ठिकाणी हे दोन दिवशीय शिबीर भरवण्यात आले होते. निखिल बुडजडे यांनी आयोजित केलेल्या कल्याणकारी योजनांच्या ह्या शिबिराला सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.
#सत्यप्रभा न्यूज #ठाणे