नांदेड दि. ८ :- सद्यस्थितीत नांदेड शहरात कुठेही पाणी टंचाई नसून केवळ जलवाहिनीच्या तांत्रिक बिघाडामुळे शहरात काही दिवस पाणी पुरवठा खंडित झाला होता. येणाऱ्या काळात नांदेड शहराला पुरवठा करण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी आरक्षित असून नागरिकांनी पाणी टंचाईबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नांदेड जिल्हयातील पाणी टंचाई संदर्भात नांदेड शहरासाठी विष्णुपूरी प्रकल्पातून 43 दलघमी व उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून 06 दलघमी पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. मागील आठवड्यामध्ये नांदेड शहरासाठी विष्णुपूरी प्रकल्पातून काबरानगर जलशुद्धीकरण केंद्राला जाणारी पाण्याची मुख्य जलवाहिनी जीर्ण होवून फुटल्यामुळे व विद्युत मोटारीमध्ये तांत्रीक बिघाड झाल्यामुळे शहरासाठी काही दिवस पाणी पुरवठा बंद झाला होता. जलवाहिनी दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून साधारणपणे दोन दिवसात शहराचा पाणी पुरवठा सुरुळीत होईल, असे मनपा प्रशासनाने कळविले आहे.
तसेच शहराच्या पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने अतिरिक्त उपाययोजना म्हणून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील आरक्षित पिण्याच्या पाण्यापैकी 02 दलघमी पाणी सांगवी बंधाऱ्यामध्ये सोडण्याबाबत आदेश केले होते. त्यानुसार आता नांदेड महापालिकांतर्गत सांगवी बंधाऱ्यातून आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरुळीत झाला आहे. सध्या नांदेड शहरामध्ये 25 टॅंकरव्दारे व 250 बोअरवेल व्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील 15 वाडी, गावांमध्ये 15 खाजगी टॅंकरव्दारे व 141 खाजगी विहीर अधिग्रहणपैकी साधारणपणे मुखेड तालुक्यात 10, कंधार 4 व माहूर तालुक्यात 1 टॅंकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच भोकर-11, हिमायतनगर-16, नायगाव-43, मुखेड-29, लोहा-13 व किनवट 16 या तालुक्यात विहीर अधिग्रहण प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. टंचाईग्रस्त गावातील टंचाई निवारणासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे तालुक्याच्या ठिकाणी आढावा बैठक घेत आहेत. तसेच तालुक्यातील टंचाईग्रस्त गावामध्ये टंचाई निवारण संदर्भात इतर संबंधित अधिकारी आढावा बैठका घेवून प्रत्येक बाबींबर लक्ष ठेवून आहेत.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड