नांदेडच्या पाच बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी
भाजपचे मिलिंद देशमुख, वैशाली देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे व संजय घोगरे यांचा समावेश
नांदेड दि.६ : विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाने तिकीट दिले नाही, म्हणून महायुतीचा उमेदवार असतानाही अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करीत बंडखोरी करणाऱ्या महाराष्ट्रातील भाजपच्या ४० पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने राज्यातील वेगवेगळ्या ३७ विधानसभा मतदारसंघातून ४० जणांची हकालपट्टी केली आहे. यात नांदेड उत्तर मधून भाजपशी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणारे मिलिंद देशमुख, माजी नगरसेविका वैशाली देशमुख, तर नांदेड दक्षिण मतदार संघातून भाजपशी अर्थात महायुतीशी बंडखोरी करून भाजपचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे व संजय घोगरे यांचाही समावेश आहे. पक्षाचे पदाधिकारी असून पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका या बंडखोरांवर ठेवण्यात आला आहे. मंगळवार दि. ५ नोव्हेंबर रोजी, भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीनिशी ४० जणांची यादी आज 6 नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
पक्षासोबत बंडखोरी करणाऱ्या 40 जणांना अखेर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने पक्षाकडून ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरी करणाऱ्यांवर पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित करणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच सांगितले होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड