जुन्या नांदेड भागातील हबीब टॉकीज ते जुना गंज रस्त्याने घेतला मोकळा श्वास
नांदेड दि.२३: जुन्या नांदेड भागातील मुख्य बाजारपेठ असलेला व अतिशय दाटीवाटीचा रस्ता म्हणुन ओळखला जाणारा हबीब टॉकीज ते बर्की चौक ते जुना गंज (पहेलवान टी हाऊस) या रस्त्यावरील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या अतिक्रमण धारकांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला असुन महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे धडक कारवाई करुन या परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजुने झालेले अतिक्रमण काढुन टाकले आहे.
बऱ्याच दिवसांपासुन जुन्या नांदेड भागातील अतिक्रणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्याअनुषंगाने मागील काही दिवसांपासुन महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अनधिकृतपणे अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांवर धडक मोहिम सुरु आहे. त्याचाच भाग म्हणुन जुन्या नांदेड भागातील अतिशय वर्दळीचा असणारा हबीब टॉकीज ते बर्की चौक ते जुना गंज या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकण्याची कार्यवाही महानगरपालिका व पोलीस विभागाने संयुक्तपणे पार पाडली आहे. या कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने १२० अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली तसेच तब्बल ०४ ट्रक माल जप्त करण्यात आला आहे.
सदरील कारवाई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, राजेश जाधव, गौतम कवडे, अग्निशमन अधिकारी के.जी. दासरे, अतिक्रमण पथक प्रमुख विशाल सोनकांबळे, अनिल चौदंते यांच्यासह महापालिकेचे ६० कर्मचारी तसेच पोलीस विभागातील ५० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
चौकट
महानगरपालिका हद्दीत मुख्य रस्त्यावर व्यापाऱ्यांनी व नागरीकांनी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण न करता रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. शहरातील मुख्य रस्ते अथवा इतरत्र अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासना तर्फे देण्यात येत असुन यापुढे सुध्दा महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शहरातील अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याची मोहिम सुरुच राहील असे मनपा उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु यांनी यावेळी स्पष्ट केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड