नांदेड दि.२०: नेहमीचा हिमालयाच्या भेटीला जाणारा सह्याद्री आता विलक्षण दुबळा जाणवतो. कारण महाराष्ट्राचे प्रादेशिक पक्षांचे राजकारण छिन्नविछिन्न झाले आहे. सध्या चार-दोन जागांसाठी प्रादेशिक पक्षांची ससेहोलपट सुरूच आहे. शिवसेनेचे विभाजन झाल्यापासून भाजपसोबत जाण्याची चाचपणी मनसे नेतृत्त्वाने केल्याचे अनेकदा दिसून आले. अखेर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीला जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या ‘दक्षिण मुंबई’ आणि ‘दक्षिण-मध्य मुंबई’ या दोन जागांचा प्रस्ताव भाजपा श्रेष्ठीसमोर ठेवला. भाजपा नेते अमित शाहांनी मनसेच्या या दोन जागांचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
राज ठाकरेना एकच जागेवर मानावे लागेल समाधान
संपूर्ण मुंबईवर भाजपला आपले वर्चस्व निर्माण करायचे आहे, त्यांची ही सुप्त इच्छा अशाप्रकारे उघडी पडता आहे. म्हणूनच मनसेला केवळ एकच जागा देता येईल, असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याने राज ठाकरेना आता एकाच जागेवर समाधान मानावे लागणार आहे. महाराष्ट्रात होणारी आगामी विधानसभा देखील एकत्र लढवू, पण त्याचे जागा वाटप तेंव्हाच ठरवू, असे देखील अमित शाहांनी राज ठाकरे यांना सांगितले आहे. या बैठकीनंतर राज ठाकरे याबाबत काय निर्णय घेतात याकडे मनसेच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
एकेकाळी अख्खा महाराष्ट्र काबीज करायला निघालेल्या मनसेची ही आजची अवस्था आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असा बाणा असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांवर दिल्लीश्वराकडे लोटांगण घालण्याची वेळ येऊन ठेपली आहे, हे अतिशय क्लेशदायक चित्र सध्या निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील सुजाण मतदार हे बदलते चित्र पाहून व्याकूळ होत आहे. या लोकसभेच्या निवडणुकीतून मतदारांनी योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे, अन्यथा दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र कायमस्वरूपी मांडलिक होऊन बसेल, याची महाराष्ट्रीय मतदारांनी काळजी घेतली पाहिजे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड