मिझोराम : काल राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभेचे निकाल समोर आले. तेलंगणा वगळता तीनही राज्यात भाजपला बहुमत मिळाले. या चार राज्यांच्या मतमोजणीनंतर आज मिझोराम विधानसभेची मतमोजणी होणार आहे. 4 पैकी 3 राज्यांमध्ये भाजपच्या विजयानंतर मिझोराममध्ये (Mizoram Election) आता कोणाचे सरकार येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिझोरम विधानसभेच्या 40 जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते.
राज्यातील 8.57 लाख मतदारांपैकी 78 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत एकूण 174 उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ), मुख्य विरोधी झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) आणि काँग्रेसने सर्व 40 जागांवर उमेदवार उभे केले होते. भाजप 23 मतदारसंघात निवडणूक लढवली. तर मिझोराममध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाने (आप) चार जागांवर निवडणूक लढवली. याशिवाय 27 अपक्ष उमेदवारही रिंगणात होते.
एक्झिट पोलनुसार, मिझोराममध्ये सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट आणि झोरम पीपल्स मूव्हमेंट यांच्यात काटे की टक्कर होण्याचा अंदाज आहे. विविध संघटनांच्या एक्झिट पोलनुसार मिझोराममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. पक्षाला 28 ते 35 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली. तर सध्याचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांच्या मिझो नॅशनला फ्रंटला एक्सिट पोलमध्ये कमी जागा निवडणून येतील, असं सांगितलं. 4 पैकी 3 राज्यांमध्ये पिछाडीवर पडलेली काँग्रेस मिझोराममध्ये गेम चेंजर ठरू शकते. कॉंग्रेसने मिझो नॅशनल फ्रंटला (एमएनएफ) साथ दिली तर हा पक्ष पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकतो.
मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथंगा यांनी विश्वास व्यक्त केला की 40 सदस्यांच्या विधानसभेत MNF 21 चा जादूई आकडा पार करून सत्तेत परत येईल. जर पक्षाने सरकार स्थापन केले तर ते ईशान्येकडील राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी संसाधने एकत्रित करण्यास प्राधान्य देतील, असे ते म्हणाले. तर झोरामथांगाचे मुख्य प्रतिस्पर्धी झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) चे प्रमुख लालदुहोमा यांनीही दावा केला की त्यांच्या पक्षाला विधानसभेत पूर्ण बहुमत मिळेल.
2018 च्या विधानसभा निवडणुकीत झोरमथांगाच्या पक्षाने 10 वर्षांचा वनवास संपवून सत्तेत स्थान मिळवलं होतं. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत, मिझोरमच्या मिझो नॅशनल फ्रंट आणि त्याचे अध्यक्ष झोरामथांगा यांनी मिझोराम विधानसभा निवडणुकीत 28 जागा जिंकून जोरदार पुनरागमन केले होते. दरम्यान, मिझोराम निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. या राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता येते? मतदार कोणाला कौल देणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड #इलेक्शन