नांदेड दि.१७ : छोट्याशा शहरातील शालेय विद्यार्थ्यांची हिरो होण्याची इच्छा, त्यासाठी त्यांनी मित्रांसोबत मुंबईला केलेले पलायन, प्रवासातील हाल आणि गावी परतल्यानंतर वर्गात गुरुजींनी ‘तुम्हाला मुंबईचा हिरो बघायचा आहे का?’ असे म्हणून केलेली नामुष्की व बाकावर उभे राहण्याची दिलेली शिक्षा, असे अनुभव सांगत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठीतील कथाकारांनी श्रोत्यांना खेळवून ठेवले श्रोत्यांना खेळवून ठेवले. कधी हशा, कधी टाळ्या, तर कधी अंतर्मुख होत रसिकांनी कथांचा आस्वाद घेतला.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा संकुलात कथाकथनाचे आयोजन करण्यात आले होते. जेष्ठ कथाकार दिगंबर कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात राम तरटे, भारत दाढेल आणि स्वाती कान्हेगावकर यांच्या कथांनी रंगत भरली.
![](https://www.satyaprabhanews.com/wp-content/uploads/2024/01/image_editor_output_image-31885148-1705512848098377441472460529025-1024x439.jpg)
‘किसना’ या कथासंग्रहाचे लेखक भारत दाढेल यांच्या ‘आणि मी हिरो झालो’ या कथेने कथाकथनाची सुरुवात झाली. पाथरी या शहरातील शालेय जीवनातील अनुभव त्यांनी कथेतून सांगितले. स्वाती कान्हेगावकर यांनी कुटुंबामधील विसंवाद आणि अबोलपणा यावर नेमके भाष्य करत श्रोत्यांना अंतर्मुख केले. एकाकीपणाचा तीव्र दंश आधुनिक काळात बहुतेक कुटुंबामध्ये जाणवत आहे याचा प्रत्यय कान्हेगावकर यांच्या कथेने आणून दिला.
कथाकार राम तरटे यांनी अस्सल नांदेडी बोलीमध्ये कथा सांगितली. ‘बारा आण्याची गोष्ट’ या त्यांच्या कथेला रसिकांनी दिलखुलास दाद दिली. सीमाप्रदेशातील लोकांच्या भाषिक लकबी त्यांनी हुबेहूब रंगवल्या.
दिगंबर कदम यांच्या ‘पांगुळ’ कथेने कार्यक्रमाचा समारोप झाला. ग्रामसंस्कृतीतून लोप होत जाणाऱ्या पांगुळ या लोकउपासकाचे चित्र विनोदी प्रसंगांच्या साह्याने दिगंबर कदम यांनी उभे केले.
![](https://www.satyaprabhanews.com/wp-content/uploads/2024/01/image_editor_output_image-26344022-17055128736028239511618929159123-1024x795.jpg)
कथाकथनाच्या प्रारंभी मराठी विभागप्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांनी कथाकरांचा परिचय करून दिला.बाबू जि़कलोड यांनी सूत्रसंचालन तर शेवटी मुजीब अन्सारी यांनी आभार मानले. या सोहळ्यास डॉ. रमेश ढगे, डॉ. राजेंद्र गोणारकर, प्रा. झिशान अली, डॉ. योगिनी सातारकर, डॉ. पी. विठ्ठल डॉ. शैलजा वाडीकर, प्रा. राहुल गायकवाड, प्रा. कैलास पुपुलवाड, प्रा. नामदेव बोम्पीलवार, प्रा. अभिजीत वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत शुक्रवार दिनांक १९ जानेवारी रोजी सुमन केशरी यांच्या ‘गांधारी’ या नाट्यसंहितेचे अभिवाचन ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे प्राध्यापक व विद्यार्थी करणार आहेत. डॉ. स्वाती दामोदरे यांनी ‘गांधारी’ चा मराठी अनुवाद केला असून डॉ. महेश जोशी अध्यक्षस्थानी असतील.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड