नांदेड दि.३ : आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाला अर्थात ६ जानेवारीला सोमवारी जिल्हा माहिती कार्यालयाने पत्रकार दिनाचे आयोजन केले आहे. नियोजन भवन येथे दुपारी ४ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बातमीदारी ‘ या विषयावर पत्रकारांना संबोधित करणार आहेत. नांदेड जिल्हा प्रशासन, नांदेड पोलीस प्रशासन, जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटना व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिनाच्या पर्वावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ जानेवारी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती दिवस.मराठी पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. या दिनाचे औचित्य साधून पत्रकारांसोबत प्रशासनाचा संवाद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी 'कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बातमीदारी ', या विषयावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा बातमीदारीमध्ये कशा पद्धतीने वापर करता येईल, त्याचे फायदे व तोटे याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार उपस्थित राहणार असून ते देखील पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
सोमवार दिनांक ६ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता जिल्ह्यातील विविध संघटनांशी, माध्यम संस्थांशी, केंद्रांशी संबंधित सर्व प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड