विजय पाटील
वैजापूर दि : १०: केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने लग्नाच्या आमिषाने ३६ वर्षीय महिलेवर २ वर्षे वारंवार बलात्कार केल्याची घटना वैजापूरमध्ये रविवारी (८ डिसेंबर) समोर आल्याने खळबळ उडाली आहे. विरगाव पोलिसांनी तातेराव दिनकर जाधव (रा. वक्ती, ता. वैजापूर) या जवानाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला अविवाहित आहे. मराठी मॅट्रीमोनी वेबसाइटवरून तिची तातेरावसोबत ओळख झाली. ओळखीतून दोघांत संवाद वाढला. दोघांत घट्ट मैत्री आणि नंतर प्रेम फुलले. तातेरावने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली. १८ ऑगस्ट २०२२ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत त्याने अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले.
मात्र लग्न करण्यास तो टाळाटाळ करत होता. तिने स्पष्टच विचारले असता त्याने पाच लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास लग्न करण्यास नकार दिला. याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आल्याने तिने विरगाव पोलीस ठाणे गाठून तातेरावविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी रविवारी (८ डिसेंबर) रात्री आठला गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास फौजदार मनीषा जगताप करत आहेत.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर