छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ! विजय पाटील !
दि : २२/०१/२०२४
जालना हॉस्पिटलजवळ मध्यरात्री युवकाला कमरेच्या पट्ट्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रकृती ठिक नसलेल्या मैत्रीणीच्या मदतीला धावून जाणाऱ्या युवकावर तिघांनी हल्ला चढवल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. ही घटना जालना शहरातील जालना हॉस्पिटलजवळ मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली.
कुलदीप दत्तात्रय डोळेझाके (वय 32वर्षे व्यवसाय-मजुरी रा. नरीमानगर ह मु अंबडचौफुली ता. जि.जालना) असे जखमी युवकाचे नाव आहे. कुलदीप डोळेझाके यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दि. 20/01/2024 रोजी कुलदीप डोळेझाके हे रात्री 12.00 वाजेच्या सुमारास घरी झोपलेले असताना मैत्रीणीचा फोन आला. ती म्हणाली की, माझी तब्येत
ठिक नाही. मला दवाखान्यात जाणे आहे. माझ्याजवळ कोणीही नसल्याने मला दवाखान्यात घेवून जाण्यासाठी तू माझ्या घरी ये असे सांगितल्यावरून कुलदीप डोळेझाके हे मैत्रीणीच्या घरी अंबड चौफुली येथे पोहोचले.
मैत्रीणीला भेटून जालना हॉस्पिटल येथे डॉक्टर आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी जालना हॉस्पिटल येथे दि. 21/01/2024रोजी 02.15
वाजता पोहोचले. तेथे कुलदीप डोळेझाके यांना त्यांच्या ओळखीचे दोघे भेटले व त्यांनी जवळ येवून स्कुटीच्या सिटवर थाप मारून ही स्कुटी तुझी आहे का ? असे विचारले. त्याचवेळी एकाने कुलदीप डोळेझाके याचे दोन्ही हात धरले व दुसर्याने डोक्यात दगड मारून डोके फोडले. त्यानंतर एकाने त्याच्या कमरेतील पट्टा काढून त्या पट्ट्यानी छातीवर तोंडावर व हातावर, पायावर मारुन मुका मार दिल्याचे फिर्यादीत
नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी कुलदीप डोळेझाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1) गणेश मांडोळे 2) विकी मांडोळे 3) मयुर डोईफोडे यांच्यावर तालुका जालना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहे.
सत्यप्रभा न्यूज