मिझोराम :काल राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. तेलंगणा वगळता तीनही राज्यात भाजपने काँग्रेसचा पराभव केला. दरम्यान, आज मिझोरम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सध्या सुरूवातीचे कल समोर आले. यात झोरम पीपल्स मूव्हेंट पक्षाने बहुमताच्या आकड्यांपेक्षा जास्त आघाडी मिळवली. तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट पक्षाला अवघ्या सात जागा जिंकता आल्या.
मिझोराममध्ये सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट आणि झोरम पीपल्स मूव्हमेंट यांच्यात काटे की टक्कर बघायला मिळेल, असा अंदाज होता. विविध संघटनांच्या एक्झिट पोलनुसार मिझोराममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता होती. पक्षाला 28 ते 35 जागा मिळतील असा अंदाज होता. तथापि, हाती आलेल्या कलानुसार, झोरम पीपल्स मूव्हमेंट पार्टीने 29 जागा जिंकल्या, तर मिझो नॅशनल फ्रंटने 7 जागा जिंकल्या. भाजपला 3 तर काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली आहेत. मिझोरामध्ये सत्ता बदल होण्याची चिन्ह सुरूवातीच्या कलांमध्ये दिसत आहेत.
मिझोराम विधानसभा निवडणुकीतील विजय मिळवण्यसाठी बहुमताचा जादुई आकडा 21 आहे. त्यानुसार, झेडपीएमने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
या निवडणुकीत झेडपीएम आणि एमएनएफसह, काँग्रेसनेही मिझोरामच्या सर्व 40 जागांवर आपले उमेदवार उभे केले. त्यामुळे येथे तिरंगी लढत होणार असे वाटत होते. मात्र, निकालानंतर येथे काँग्रेसचा फुसका बार निघाल्याचं दिसत आहे. दहा वाजेपर्यंत कॉंग्रेसने फक्त एक जागा जिंकली.
आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार झेडपीला बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त आघाडी मिळाली आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार लाल दुहोमा म्हणाले, “हे निकाल अपेक्षित होते, त्यामुळे मला फारसे आश्चर्य वाटत नाही… निकालाची वाट पाहूया.
2018 च्या विधानसभा निवडणुकीत, झोरमथांगाचा पक्ष 10 वर्षांचा वनवास संपवून सत्तेवर आला होता. 2018 च्या निवडणुकीत, मिझोरमच्या मिझो नॅशनल फ्रंट आणि त्याचे अध्यक्ष झोरामथांगा यांनी 28 जागा जिंकून जोरदार पुनरागमन केलं होतं. मात्र, यंदाच्या निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात झेडपीएम पक्षाला जास्त जागा मिळल्याचं दिसून येतं.