विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर
दि११: पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमधील सेनाभवन कार्यालयासमोर आंदोलनात करताना धाडस संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी विष पिले, तर चार कार्यकर्त्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. हा प्रकार गुरुवारी (१० ऑक्टोबर) दुपारी एकच्या सुमारास घडला. आदिवासी कोळी समाजाला कोळी मल्हार जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यात यावे, या मागणीसाठी टोकाची भूमिका घेत हे आंदोलन करण्यात आले.
राजू दांडगे, दीपक सुरडकर (रा. उंडणगाव) अशी विष पिणाऱ्यांची नावे आहेत, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रवींद्र इंगळे, सीताराम पाडळे, दयानंद शेवाळे, दिनेश तांबे अशी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्यांची नावे आहेत. मंत्री सत्तार यांनी आदिवासी कोळी समाजाची बैठक घेऊन कोळी मल्हार जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र ते पूर्ण केले नाही, असा आरोप करत या मागणीबाबत चर्चा करण्यासाठी धाडस संघटनेचे कार्यकर्ते गुरुवारी सत्तार यांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र हे सत्तार कॅबिनेट बैठकीसाठी मुंबईला गेलेले होते. त्यानंतर आक्रमक होत कार्यकर्त्यांनी दुपारी एकच्या सुमारास टोकाची भूमिका घेतली. सिल्लोड शहर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना तत्काळ ताब्यात घेत रुग्णालयात नेले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न तत्काळ सोडवला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री सत्तार यांनी स्वीय सहायकांमार्फत आंदोलनकर्त्यांना फोनद्वारे दिले. यावेळी धाडस संघटनेचे तालुका सचिव अंबादास सुरडकर म्हणाले, की दुपारी कार्यालयासमोर गेल्यानंतर पायऱ्यांवरच पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी अडवले. आम्ही कार्यालयात गेलो असता त्यांनी पोलिसांना बोलावले.
सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर