दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.१७:सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम जोरात चालू असून त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंतरेड्डी यांची प्रचाररॅली धर्माबाद शहरात आठवडी बाजाराच्या दिवशी अर्थात रविवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र सदरील रॅलीला संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्री रेवंतरेड्डी येऊ न शकल्याने ही रॅली फ्लॉपच ठरली.
महविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार खासदार राहिलेले भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सूनबाई डॉ. मिनलताई खतगावकर यांना उमेदवारी मिळाली. आता ही उमेदवारी मिळाली की नुसती धावपळ करून त्यांनी मिळवली हे जनता जाणून आहे. आणि विशेष म्हणजे ते बिलोली मतदारसंघातील असून तो मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे त्यांनी शेजारील नायगाव विधानसभा मतदारसंघात एकप्रकारची राजकीय घुसखोरी केली म्हणायला काही हरकत नाही. मागील निवडणुका संपल्या नंतर थेट आता चालू असलेल्या निवडणुकीवेळी त्यांना मतदारसंघ आणि इथला विकास आठवू लागला. कुठल्याही कार्यकर्ते किंवा जनतेचा आग्रह नसताना बाहेरील उमेदवार देणं इथे मविआ ला महागात पडणार आहे. अशातच रविवारी आयोजित केलेल्या रॅलीला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंतरेड्डी अनुपस्थित राहिल्याने ही रॅली फ्लॉप ठरली असून इथे जमलेल्या लोकांपैकी बहुतांश लोकं सुद्धा शेजारील तेलंगणा राज्यातून आलेले पाहायला मिळत होते त्याचं कारण एकच होते ते म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री येणार नसल्याची माहिती मिळताच जमलेली गर्दीही हळूहळू ओसरली होती.
चौकट
धार्मिक झेंडे लावून साद घालण्याचा प्रयत्न
उपरोक्त रॅलीत निळे,पिवळे झेंडे लावून बहुजन समाजाला भावनिक साद घालण्याचा केविलवाणा प्रयत्न यावेळी केल्याचेही निदर्शनास येत होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड