सत्यप्रभा न्युज नेटवर्क
विजय पाटील
फुलंब्री दि.२ :
टेलिग्रामच्या एका ग्रुपमध्ये फुलंब्रीच्या तरुणाला ॲड करून दामदुप्पटीचे आमिष दाखवून ५ लाख ६२ हजार ४०० रुपयांना भामट्याने गंडवले. मात्र वेळीच तरुणाने सायबर पोलिसांत धाव घेतल्याने पोलिसांनी त्याची रक्कम परत मिळवून देण्याची मोठी कामगिरी पोलिसांनी केली.
पैशांची गुंतवणूक केल्यास काही तासांत दामदुप्पट रक्कम मिळणार, असे आमिष टेलिग्रामवरील एका ग्रुपमध्ये फुलंब्री येथील अण्णा मोटे याला दाखविण्यात आले. सायबर भामट्याने मोटे याला विश्वासात घेत टप्याटप्प्याने एकूण ५ लाख ६२ हजार ४०० रुपये उकळले. मात्र अनेक तास उलटूनही दामदुप्पट सोडा, पण मूळ रक्कमही परत न मिळाल्याने मोटे याला फसवणूक झाल्याचा संशय आला. त्याने लगेचच ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलिसांकडे तक्रार केली.
पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले व त्यांच्या पथकाने तत्काळ अण्णा मोटे याने रक्कम पाठविलेल्या बँक खात्याचा तपशील मिळवून ही रक्कम इतर खात्यांत वळविण्यात येऊ नये यासाठी कोटक महिंद्रा बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क केला. ही रक्कम गोठविण्यात यश मिळविले. त्यामुळे भामट्याला ही रक्कम काढून घेता आली नाही. यामुळे ५ लाख ६२ हजार ४०० रुपयांची रक्कम परत मोटे याच्या बँक खात्यात जमा करून घेण्यात पोलिसांना यश आले. ही महत्त्वपूर्ण कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, अंमलदार मुकेश घोरपडे यांनी केली.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर