लातूर प्रतिनिधी विजय पाटील दि१७ : राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही असे म्हटले जाते. आता विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु होणार आहे. कोणत्या मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार ? याचे आडाखे बांधले जात आहेत. अशातच एक महत्वाची बातमी हाती आली असून भाजपचे माजी खासदार सुधाकर शृंगारे हे लवकरच भाजपच्या गोटातून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तुतारी हाती घेणार असल्याचे समजते. त्यामुळे लातूरच्या राजकारणात लवकरच हा भूकंप झाल्यास नवल वाटू नये.
लोकसभा निवडणुकीत सुधाकर शृंगारे यांचा पराभव भाजपच्याच काही नेत्यांमुळे झाला असल्याचे बोलले जात होते. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही आपल्या नशिबी पराभवाचे शल्य आल्याने सुधाकर शृंगारे मागच्या दिवसापासून भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात होते. अशातच त्यांनी मुंबई प्रवासात थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक – अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या भेटीत माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी शरद पवारांची ‘ तुतारी ‘ आपल्या हातात घेण्याची तयारी दर्शवल्याचे सांगण्यात येत आहे. सुधाकर शृंगारे यांचा भाजपच्या अनेक नेत्यांनी वापर करून घेतला व नंतर ते त्यांच्यावरच उलटल्याची खदखद शृंगारे यांच्या मनात मागच्या अनेक दिवसांपासून सलत होती. ही खदखद त्यांनी शरद पवारांच्या या भेटीत बाहेर काढल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात केली जात आहे.
सुधाकर शृंगारे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केव्हा आणि कुठे होणार ? याची अद्याप माहिती उपलब्ध नसली तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधीच शृंगारे राष्ट्रवादीवाशी होतील असे सांगण्यात येत आहे. शृंगारे जर राष्ट्रवादीमध्ये गेले तर शरद पवार त्यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास ते ज्या मतदार संघातून मैदानात उतरतील तेथील निवडणूक निश्चितच अतिशय चुरशीची होणार आहे.
#सत्यप्रभा न्यूज #लातूर