विजय पाटील
वैजापूर दि.२ : तालुक्यातील शिऊर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने धाव घेऊन आपली मुलगी आणि नातवाच्या अपहरणाची तक्रार नोंदवली आहे. विशेष म्हणजे हे अपहरण दुसऱ्या-तिसऱ्या कुणी नाही, तर तिच्या पतीने केले आहे. पत्नी आणि आपल्या मुलाचे अपहरणाचा गुन्हा शिऊर पोलिसांनी युवकाविरुद्ध दाखल केला आहे. ही घटना शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे.
या प्रकरणात तरुणीच्या वडिलांनी पोलीस तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीचे लग्न वैजापूर येथील युवकासोबत झाले होते. मात्र तो तिला नेहमी मारहाण करायचा. त्यातच त्याने दुसरे लग्न केले. त्यामुळे त्यांनी मुलीला माहेरी आणले होते. दीड वर्षापासून ती आई-वडिलांकडेच राहत होती. तिला पतीपासून एक मुलगा आहे. मुलगी आणि जावई (पती-पत्नी) यांच्यातील प्रकरण न्यायालयात सुरू आहे. तरुणीचे वडील कपाशीची गाडी भरण्यासाठी धोंदलगावला गेले होते, तर आई बाजार करण्यासाठी गावात गेलेली होती. त्याचदरम्यान तरुणीचा पती स्विफ्ट कार घेऊन आला. त्याने पत्नी आणि मुलाला कारमध्ये बसवून पळवून नेले. ही बाब घरी आल्यावर लक्षात येताच तरुणीच्या वडिलांनी शिऊर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी युवक व त्याचा मित्र अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सविता पिंगट करत आहेत.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर