नांदेड दि.१०:आज जगभरात कृतीम बुद्धिमत्तेची वाढ झपाट्याने होत आहे. बिग डेटा च्या माध्यमातून ए.आय. स्वतःला अद्यावत करीत आहे. हळूहळू मानवाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. शेती, आरोग्य सेवा, शिक्षण, संवाद, रोजगार, बँकिंग, विमा, शेअर बाजार, कारखाने, वाहतूक इत्यादी अनेक क्षेत्रात कृतीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने आपली पाया-मुळे रोवली आहेत. त्या आधारावर जवळील काही वर्षात हे तंत्रज्ञान अजून प्रगती करेल आणि सर्वच क्षेत्रात क्रांती घडवेल, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातिचे लेखक, साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले.
ते दि. १० फेब्रुवारी रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये ‘ए.आय तंत्रज्ञान: आज आणि उद्या’ विषयावर विशेष व्याख्यान प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, इंजि. नारायण चौधरी, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठता डॉ. एम.के. पाटील, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. डी.ए.म खंदारे, सामाजिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. घनश्याम येळणे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखा अधिकारी मोहम्मद शकील यांची यावेळी उपस्थिती होती.
पुढे गोडबोले म्हणाले, येथे प्रत्येक मिनीटाला डेटा बदलत आहे. हा बदलणारा डेटा म्हणजेच ए.आय. चा कच्चा माल, स्वतःला अद्यावत ठेवून ए.आय. तंत्रज्ञान खूप गतीने पुढे सरकत आहे. या तंत्रज्ञानामुळे जश्या जुन्या नौकाऱ्या कमी होतील, तशाच नवीन नोकऱ्या आणि व्यवसायही निर्माण होतील. या तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने आणि जबाबदारीने वापर केल्यास मानव जातीसाठी क्रांतीकारी ठरू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यापुढे ए.आय. तंत्रज्ञानाबद्दल माहिती करून घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अध्यक्षीय समारोपात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर म्हणाले, या कार्यक्रमासाठी आज येथे जमलेल्या विद्यार्थ्यांची गर्दी बघता आजची तरुणाई नव-नवीन ज्ञानाची भुकेलेली आहे. गरज आहे ती त्यांना ज्ञान पुरवण्याची, इतिहासात साक्षर आणि निरक्षर होते. त्यानंतर ज्याला कम्प्युटर येतो तो साक्षर आणि इतर निरक्षर असे आहे. आणि भविष्यात ज्याला ए.आय. तंत्रज्ञान अवगत आहे तो साक्षर आणि इतर निरक्षर अशी काळानुरूप साक्षर आणि निरक्षर ची व्याख्या बदलत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी स्वत:ला अद्यावत ठेवून नवनवीन तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे, अशी अशाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजय उत्तरवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. बालाजी मुधोळकर यांनी केले. या कार्यक्रमास प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड