विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.२: शहरात विश्वासनगर, लेबर कॉलनी येथे १२५ कोटी रुपये खर्चून प्रशासकीय संकुल उभारले जाणार आहे. या कामाचे कंत्राट एल-१ म्हणून पुण्यातील कंत्राटदाराला शासनाने दिले. मात्र बँक गॅरंटी व अन्य कारणे पुढे करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी संकुलाची वर्कऑर्डर दुसऱ्याच कंत्राटदाराला (एल-२) परस्पद देऊन टाकल्याचा धक्कादायक प्रकार आ. प्रशांत बंब यांनी समोर आणला असून, हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याने मुख्य अभियंता श्रीनिवास कातकडे व अधीक्षक अभियंता एस. एस. भगत यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
कंत्राटदार बदलण्यासाठी शासनाकडून अभिप्रायसुद्धा येरेकर यांनी घेतला नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंत्यांनी प्रशासकीय संकुलाचे काम जागतिक बँक प्रकल्प विभागाकडे वर्ग करण्याचे पत्र येरेकर यांना दिले होते. मात्र या पत्रालाही येरेकर यांनी केराची टोपली दाखवली व एल-२ कंत्राटदाराला वर्कऑर्डरही दिली. एल-१ निविदा अंतिम झालेली असताना आणि सक्षम अधिकारी मुख्य अभियंता असताना कार्यकारी अभियंत्यांनी २५ नोव्हेंबरला कोणत्या अधिकारात कंत्राटदार बदलून त्याला वर्कऑर्डरही दिली, असा सवाल आ. बंब यांनी केला आहे.
कार्यकारी अभियंत्यांसह विभागीय लेखाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे शासनाचे मोठे नुकसान झाल्याचे बंब म्हणाले आहेत. आता या प्रकरणात बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कातकडे व अधीक्षक अभियंता एस. एस. भगत काय कारवाई करतात, हे प्रकरण आता नव्या सरकारसमोर येऊन काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकारी अभियंता येरेकर यांची मनमानी मात्र यातून समोर आली आहे. ते वरिष्ठांनाही जुमानत नसल्याने नक्की कुणाच्या पाठबळावर अशी मुजोरी करतात, याबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भातील वृत्त आजच्या अंकात एका प्रसिद्ध दैनिकाने दिले आहे.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर