नांदेड दि. २३ : निवडणूकांच्या माध्यमातून भारतीय लोकशाही अधिक सशक्त होत जाते. यात मतदारांचे नियोजनबध्द शिक्षण व निवडणुकीतील त्यांचा महत्वपूर्ण ठरणारा सहभाग याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना छत्रपती संभाजीनगर विभागातुन उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. हा पुरस्कार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जाहिर केला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या समवेत उप जिल्हा निवडणूक अधिकारी संगिता चव्हाण, लोहा विभागाचे मतदान नोंदणी अधिकारी शरद मंडलिक यांनाही या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड जिल्ह्यातील युवकांच्या मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी युवा मतदार नाव नोंदणी अभियान संपूर्ण जिल्हाभर यशस्वीपणे राबविले. मतदान पुर्नरिक्षण कार्यक्रमातर्गत वय वर्षे 18 ते 19 वयोगटामध्ये सुमारे 20 हजार 948, वय वर्षे 20 ते 29 वयोगटात 21 हजार 269 मतदारांची नव्याने भर पडली आहे. याच बरोबर त्यांनी जिल्ह्यातील दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यादृष्टीनेही त्यांना जर घराबाहेर पडणे अशक्य असेल तर त्यांना पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला.
जिल्ह्यातील तृतीयपंथी, भटके विमुक्त, गारुडी, कुडमुडे जोशी व इतर समाजातील लोकांना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पुढाकार घेतला. त्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड व इतर शासनाच्या योजनाचा लाभ देण्यासमवेत निवडणूक ओळखपत्र देवून मतदानाचा अधिकार बहाल केला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जिल्ह्यातील विविध भटक्या विमुक्ताच्या वस्तीना भेटी देवून त्यांच्याशी संवाद साधला होता.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड