लोकसभा निवडणुकीत कुणालाच पाठिंबा नाही; उभे करणार नाही अपक्ष उमेदवार- जरांगे
अंतरवाली सराटी दि.३१: या लोकसभा निवडणुकीत कोणत्याच मतदार संघात अपक्ष उमेदवार उभे करणार नाही. तसेच लोकसभा निवडणुकीत माझा कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही. ज्या उमेदवाराला पाडायचं असेल त्यांना खुशाल पाडा. आपल्याला राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं आहे, अशी भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मनोज जरांगे यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेमुळे अनेक राजकीय पक्षांचे गणित निवडणुकीदरम्यान अचानक फिस्कटणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, वसंत मोरे यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. ॲड. प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे नवीन आघाडी निर्माण करणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगली होती. मनोज जरांगे राजकारणापासून दूर राहणार हे स्पष्ट होताच, या लोकसभेला काही वेगळा प्रयोग होण्याची शक्यता कमीच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मी कुठेही आणि कोणाच्याही प्रचाराला जाणार नाही. इतर लोकांचं वेगळं आहे, पण आपलं त्यांच्या उलट असते. कारण अलीकडच्या काही दिवसात आरक्षणापेक्षा राजकारणावरच जास्त बोलणं झालं आहे. मराठ्यांनो, राजकारणाने आपलं वाटोळं होईल, तुमच्या रक्तात आरक्षण भिनले पाहिजे. ‘सगेसोयरे’ या अटीची अंमलबजावणी झाली नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत धिंगाणा घालणार असल्याचे वक्तव्य देखील मनोज जरांगे यांनी यावेळी केले.
गावागावातून मराठा समाजाने पाठवलेल्या अहवालातून अपक्ष उमेदवार देता येणार नाही, असे स्पष्ट दिसत आहे. मी खूप साधा माणूस आहे, मला राजकारण काहीच कळत नाही. मी राजकारणात असलो काय नसलो काय, माझ्यात आरक्षण मिळवून देण्याचा दम आहे. आता मराठ्यांची परिस्थिती पहिल्यासारखी राहिली नाही. जो ‘सगेसोयरे कायद्या’ला विरोध करेल त्याला पाडा. यापुढील निर्णय हा आता मराठा समाजाने घ्यावा, असे आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड